फिलिपाइन्समध्ये दहशतवादी हल्ला, 19 जणांचा मृत्यू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :27-Jan-2019
मनिला :
फिलिपाइन्सच्या जोलो प्रांतात रोमन कॅथोलिक चर्चला लक्ष्य करून दहशतवादी हल्ला करण्यात आला. रविवारची प्रार्थना करण्यासाठी चर्चमध्ये लोक जमले होते, त्याचवेळी एकापाठोपाठ दोन बॉम्बस्फोट झाले. यात किमान १९ जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी आहेत. घटनास्थळी बचाव मोहिम सुरू असून यासंदर्भात पुढील तपास सुरु आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला बॉम्बस्फोट जोलो येथील चर्चमध्ये झाला. पोलिस आणि सुरक्षा रक्षक आत धावून गेले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. त्याचवेळी चर्चच्या प्रार्थनास्थळाबाहेर दुसरा बॉम्बस्फोट झाला. या दुहेरी बॉम्बस्फोटात १९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ५० जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
  
 
बॉम्बस्फोटानंतर घटनास्थळाचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. त्यामध्ये स्फोटानंतर परिसरात तयार झालेले धुळीचे ढग दिसून आले. तर चर्च परिसरात सर्वत्र इमारतीचा ढिगारा आहे. ही घटना आवर लेडी ऑफ माउंट कार्मेल या चर्चमध्ये घडली. या चर्चला दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याची ही पहिली वेळ नाही. दरम्यान, चर्चवर झालेल्या हल्ल्यानंतर इतर धार्मिक स्थळे आणि महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोबतच, राजधानी महत्वाच्या शहरांमध्ये पोलिस आणि लष्काराला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जोलो प्रांतात गेल्या ५० वर्षांपासून मुस्लिम बहुल नागरिक आणि अल्पसंख्याक ख्रिस्ती समुदायात संघर्ष सुरू आहेत. जोलो प्रांताला स्वायत्तता आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी विविध सशस्त्र संघटना निर्माण झाल्या आहेत. या प्रांतात अबु सय्यफ या सशस्त्र बंडखोर संघटनेचे वर्चस्व आहे. बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले आणि शिरच्छेद करण्यासाठी या टोळीचे सदस्य कुप्रसिद्ध आहेत. त्यामुळे, रविवारचा हल्ला सुद्धा त्यांनीच घडवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अमेरिका आणि फिलिपाइन्सने या संघटनेला यापूर्वीच दहशतवादी घोषित केले आहे.