राम मंदिरावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :27-Jan-2019
नवी दिल्ली: 
सर्वोच्च न्यायालयातील राममंदिरावरील सुनावणी परत एकदा समोर ढकलण्यात आली. २९ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार होती परंतु, न्यायाधीश एस. ए. बोबडे या दिवशी उपस्थित राहणार नसल्याने सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे.
 
  
 
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दोन दिवसांपूर्वीच अयोध्याप्रकरणी सुनावणी करण्यासाठी ५ सदस्यीय नवीन खंडपीठ बनवले होते. सुप्रीम कोर्टातील अतिरिक्त रजिस्ट्रार लिस्टिंगकडून आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीशीनूसार घटनापीठातील न्या. एस. ए . बोबडे हे २९ जानेवारीस उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे या दिवशी अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. न्या. यू. यू. लळित यांनी स्वत:ला या खटल्यापासून वेगळे केल्यानंतर नवीन घटनापीठाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर सुनावणीची तारीख २९ जानेवारी निश्चित करण्यात आली होती. आता ही तारीखही रद्द करण्यात आली असून आता नवीन तारीख निश्चित करण्यात येणार आहे.
 
 
 
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी २५ जानेवारीला शुक्रवारी नव्या घटनापीठ गठीत केले होते. नव्या घटनापीठात न्या. अशोक भूषण, न्या. अब्दूल नजीर यांचा समावेश करण्यात आला होता. घटनापीठात सरन्यायाधीश स्वत:, न्या. एस. ए . बोबडे आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड आदींचा समावेश होता.