कंटेनरमधून चोरी गेलेल्या मुद्देमालासह आरोपींना अटक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :27-Jan-2019
१० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
मालेगाव :
एका ट्रकमधून ऑप्टिक फायबर इंटरनेट केबल चोरी प्रकरणी मालेगाव पोलिसांनी पाच आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून १२ लाखाच्या मुद्देमालापैकी ९ लाख ९८ हजार रुपये किंमतीचा (मुद्देमाल) केबल जप्त केला. सदरची कारवाई मालेगावचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली.
 
26 जानेवारी रोजी फिर्यादी मंजीत राणा जगत राणा रा. आदर्श नगर मलेरणा रोड बल्लभगड जि. फरिदाबाद (हरियाणा) यांनी लेखी तक्रार दिली की, त्यांचा ट्रक क्र.एचआर ३८ एक्स ८५८१ चा चालक खुर्शीद शहाब खान हा चेन्नई वरुन कॉमस्कॉप सोल्युशन इंडिया प्रा. लि. कंपनीचा ऑप्टिक फायबर इंटरनेट केबलचे ४२० बॉक्स ट्रकमध्ये भरुन दिल्लीकडे घेऊन जात असताना मालेगाव ते अकोला रोडवर रिधोरा फाट्याजवळ १४ जानेवारीला ट्रकचा अपघात झाला. चालकाने दिलेल्या माहितीवरुन १८ जानेवारी रोजी मी अपघातग्रस्त कंटेनर रिधोरा फाटा येथे आलो असता, सदर कंटेनरमधील कंपनीचा केबल दुसरे ट्रकमध्ये भरत असता मला ४२० बॉक्सपैकी ७७ बॉक्सी कमी आढळून आले.
 

 
               जप्त करण्यात आलेला मुद्देमाल  
 
सदर कंटेनरचा अपघात झाल्यानंतर १४ ते १८ जानेवारी या कालावधीत कंटेनरमधील ऑप्टिक फायबर इंटरनेट केबलच्या ७७ बॉक्सची किंमत १२ लाख १७ हजार ३३६ रुपये अज्ञात इसमाने चोरुन नेले. याबाबत कंपनीशी संपर्क साधून चोरी झालेल्या मालाची खात्री झाल्यानंतर २६ जानेवारीला मालेगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरुन मालेगाव पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दखल करुन पो. उपनिरिक्षक गिरीष तोगरवाड यांना तपासाची सुत्रे दिली.
 
पोलिस अधिक्षक, उपविभागीय पेालिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तपासअधिकाऱ्यांचे पथक तयार करुन सदर गुन्ह्यातील आरोपी संदिप जगन्नाथ बोरचाटे, राजु ज्ञानबा बोरचाटे, बालाजी संतोष बोरचाटे सर्व रा. डही व सुरज सुधामा ताजणे, राहुल उर्फ लाल्या युवराज सावळे दोघे रा. ईराळा यांना सदर गुन्ह्यात आज अटक केली आहे.