सायना इंडोनेशिया मास्टर्स विजेती
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :27-Jan-2019
जकार्ता :
 
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती भारताची सायना नेहवाल हिने रिओ ऑलिम्पिकचे सुवर्णपदक विजेती स्पेनच्या कॅरोलिना मारिनला धूळ चारून यावर्षाचे पहिले विजेतेपद आपल्या नावावर केले.
सामन्याच्या प्रारंभापासून विश्वविजेतीसमोर सायना सातत्याने संघर्ष करत राहिली. 8-2 अशी आघाडी घेणार्‍या दुखापतग्रस्त मारिनला असहाय्य वेदना होऊ लागल्या. 10-4 अशी एकतर्फी आघाडी मिळविली असताना अखेर नाईलाजाने तिला निवृत्त व्हावे लागले.
 

 
 
सायनाने कॅरोलिनाशी हस्तांदोलन केले. याचबरोबरच सायनाने वर्षाचे आपले पहिले विजेतेपद पटकावले. कॅरोलिना मारिन व सायना नेहवाल आतापर्यंत 12 वेळा आमने-सामने आल्या असून या विजयाबरोबर सायनाने तिच्याविरुद्धचा आपला रेकॉर्ड 6-6 असा केला. भराताच्या प्रजासत्ताक दिनी सायनाने उपांत्य सामन्यात सहावी सीड चीनच्या बिंगजियाओला 18-21, 21-12, 21-18 असे पराभूत केले व अंतिम फेरीत आपले स्थान सुनिश्चित केले.
 
हे वर्ष सर्वांसाठी महत्त्वाचे आहे, पण जे घडले नक्कीच चांगले नाही. मारिन फार कठीण प्रतिस्पर्धी होती. तिने सामन्याची सुरुवात उत्तम केली, परंतु आज जे काही घडले फार दुर्भाग्यपूर्ण होते, असे सायना म्हणाली.
2017 साली मलेशियामध्ये सायनाने बीडब्ल्यूएफ विजेतेपद पटकावले. सायनाचे हे यश प्रशंसनीय आहे, कारण गतवर्षी ती पायाच्या दुखापतीने ग्रस्त होती. नुकतीच ती दुखापतीतून सावरली आहे.
 
गत काही वर्षांत मी दुखापतग्रस्त राहिली. मी नेहमीच कणखरतेने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, त्यामागे कोणतेही रहस्य नाही. मला पाठबळ देणार्‍या फिजिओ व प्रशिक्षकांचे मी आभार मानू इच्छिते, असेही ती म्हणाली.
सायनाने यापूर्वी मलेशियामध्ये अखेरचे बीडब्ल्यूएफ विजेतेपद पटकावले. तिने 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, तर आशियाड क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. याशिवाय तिने डेन्मार्क, इंडोनेशिया मास्टर्स व सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले होते.