हिंगणी वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरातील लाखो रुपयांची लोहा चोरी उघडकीस
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :27-Jan-2019
- वरिष्ठांच्या हस्तक्षेपाने चोरून विकण्याचा प्रयत्न फसला
- स्थानिक अधिकाऱ्याने दलालाच्या माध्यमातून केली होती भंगार लोहाची विक्री.
 
सेलू, 
तालुक्यातील हिंगणी वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात ब्रिटिश काळापासून साठवून असलेले हजारो किलो भंगार लोखंड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने कोणतीही निविदा प्रक्रिया न करता दलालाच्या सहाय्याने परस्पर चोरून विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . परिसरात याची चर्चा रंगल्याने वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर विकलेला माल दुसऱ्या दिवशी परत आला असून या लाखो रुपयांच्या लोहा विक्रीची चौकशी होणे गरजेचे आहे.
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय परिसरात ब्रिटिश काळात नस्ट करण्यात आलेल्या बॉम्ब मधील लोहा, तांबे, पितळ, काशे, बीड इत्यादी सप्त धातूंचे शेकडो टन अवशेष जमा करून ठेवलेले होते. त्या कार्यालय परिसरात साठवून ठेवलेला लाखो रुपयांच्या भंगार धातूचा रेकार्ड कार्यालयात आहे की नाही याची कसलीही कल्पना स्थानिक अधिकाऱ्यांना नसल्याने त्यांनी आपल्याच वन खात्यात सागवान झाडाच्या खसऱ्याचा व्यवसाय करणाऱ्या बंटी नामक दलालाला  हाताशी धरून हे लाखो रुपयांचे भंगार लोहा विकण्याचा बेत आखला. १९ जानेवारीला त्या दलालामार्फत सेलूच्या एका भंगार व्यावसाईकसोबत  24 रुपये किलो प्रमाणे सौदा पक्का करण्यात आला. त्यासाठी कागदोपत्री लिलाव प्रक्रिया केल्याचे वन खात्याचे पत्र देण्याचा शब्द वन अधिकाऱ्यांनी दिला होता.
 
 
                  परत आलेले लोखंड 
 
19 जानेवारीला दिवसभर ट्रक भरून सायंकाळी 8 वाजता सेलू येथे वजन काट्यावर त्या भंगार लोहा भरलेल्या ट्रक चे वजन करण्यात आले ज्याचे वजन 10 टण असे होते. त्या भंगाराची विल्हेवाट लावण्यासाठी भंगार व्यावसायिकाने लिलाव झाल्याची कागदपत्रे त्या दलाला मागितली असता सकाळी भेटून जाईल असे सांगून वेळ मारून नेली. कार्यालय परिसरातील एक ट्रक भंगार लोहा साहेबांनी विकल्याची कुन कुन कर्मचाऱ्यांना लागताच, त्यांनीही हिंगणी येथील एका जेसीबी चालकाला हाताशी धरून त्यातील एक ट्रक भंगार लोहा अंदाजे 16 टन विकला.
 
याची माहिती पहिले सौदा झालेल्या सेलू येथील व्यावसायिकाला मिळताच त्याने संबंधित वन अधिकाऱ्याला त्याबाबत विचारले असता या चोरून लपून भंगार लोहा विक्रीचा प्रकार उजेडात आला. कार्यालयातीलच एकाने त्या भंगार विक्रीची माहिती वर्धा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी लागलीच वन परिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे यांची कान उघाडणी करून ते विकलेले भंगार परत आणण्याचे आदेश दिले.
 
अधिकाऱ्यांच्या आदेशाने भांबावलेल्या हिंगणी येथील वन अधिकाऱ्याने विकलेले भंगार परत आणण्याची त्या व्यावसायिकांना विनवणी केल्याने काही तासातच विकलेले दोन्ही ट्रक भंगार हिंगणी कार्यालयात परत आणण्यात आले.
हिंगणी येथील वन कार्यालयातून परस्पर लाखो रुपयांचे भंगार लोहा विक्री प्रकरणाची येथे चांगलीच चर्चा सुरू असून या प्रकरणी सखोल चौकशी झाल्यास अनेक मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.