105 वर्षाच्या वृद्धाचे हिप प्रत्यारोपण, डॉक्टरांना गिनीज बुकात नोंद होण्याची अपेक्षा
नवी दिल्ली :
येथिल एका रुग्णालयात 105 वर्षीय वृद्धाचे हिप प्रत्यारोपण करण्यात आले आहे, ही शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टरांनी दावा केला आहे की, शस्त्रक्रिया करण्यात आलेला रुग्णाचे वय जगात सर्वाधिक आहे. अस्थिरोग तज्ज्ञ कौशल कांत मिश्रा यांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यांनी सांगितले की, त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याबाबत आधीच अर्ज सादर केला आहे.
ते म्हणाले की, गुरबचनसिंग संधू असे वयोवृद्ध रुग्णाचे नाव असून, ते आपल्या घरात पाय घसरुन पडल्यानंतर त्यांना चालता-फिरता येत नव्हते, त्यांनतर 19 जानेवारीला त्यांना आमच्या रुग्णालयात आणण्यात आले, येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना थोडे चालता आल्यानंतर 22 जानेवारीला डिस्चार्ज देण्यात आला. मध्य दिल्लीतील प्राइम रुग्णालयातील अस्थिरोग विभागप्रमुखांनी सांगितले की, गुरबचन यांना आता काठीच्या सहाय्याने चालता येत आहे आणि त्यांच्या शारिरीक तंदुरुस्तीमुळे शस्त्रक्रियेत फार मदत मिळाली.
गुरबचनसिंग यांचा जन्म स्वातंत्र्यपुर्व काळात भारतातील पंजाबमध्ये झाला आणि ते 1971 मध्ये सुरक्षा दलात अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. येत्या 28 मार्चला ते आपला 106 वा वाढदिवस साजरा करतील. मी जगात आतापर्यंत हिप प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांबाबत माहिती मिळवली असून, आतापर्यंत एवढ्या वयोवृद्ध रुग्णावर ही शस्त्रक्रिया झाल्याचे आढळले नसल्याचे त्यांनी सांगितले. 102 वर्षाच्या ब्रिटीश नागरिक जॉन रांडेल यांची हिप प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियेची गिनीज बुकात नोंद असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.