प्रियांकाचे आगमन- संधी आणि आव्हान...
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019
दिल्ली दिनांक / रवींद्र दाणी
राजकारण हे सरकत्या रंगमचासारखे असते. ज्याचे रंग व दृश्ये सतत बदलत असतात. उत्तरप्रदेशात सपा-बसपा यांनी युती करून एक राजकीय चित्र तयार केले होते. त्याला जबर धक्का प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाने दिला.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली बहीण प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणल्याने देशाच्या सर्वात मोठ्या राज्यातील सपा-बसपा या दोन्ही पक्षांना जबर तडाखा बसला आहे. विशेष म्हणजे प्रियांका गांधींकडे, पूर्व उत्तरप्रदेश म्हणजे वाराणसी, अलाहाबाद, कानपूर-गोरखपूर, फुलपूर या भागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे; तर मध्यप्रदेशातील कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मेरठ, आग्रा, बागपत, सहारनपूर, अलिगढ, कैराना या जाट प्रभावाच्या भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उत्तरप्रदेशचे तीन भाग मानले जातात. त्यातील पूर्व उत्तरप्रदेशात लोकसभेचे 33 मतदारसंघ आहेत. मध्य उत्तरप्रदेशात 14 मतदारसंघ, तर पश्चिम उत्तरप्रदेशात 33 मतदारसंघ आहेत.
 
 
 
सपा-बसपाला उत्तर
उत्तरप्रदेश हा कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. 1977 च्या जनता लाटेत तो उद्ध्वस्त झाला. मात्र, तीन वर्षांतच 1980 मध्ये कॉंग्रेसने तो पुन्हा काबीज केला. 1990 च्या मंडल-कमंडलच्या राजकारणात कॉंग्रेसच्या हाती कमंडल आलेे आणि पक्ष राजकीय वनवासात गेला. पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, गोिंवद वल्लभ पंत, कमलापती त्रिपाठी यांच्यासारखे रथी-महारथी देणार्‍या या राज्यात कॉंग्रेसचे पानिपत होत राहिले आणि भाजपा, सपा, बसपा या तीन पक्षांनी राज्यातील राजकारणाची सूत्रे आपल्या हाती ठेवली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत फक्त अमेठी व रायबरेली या दोन जागा पदरात पडलेल्या कॉंग्रेसने, 2019 साठी मात्र मोठी अपेक्षा ठेवली होती. सपा-बसपा आपल्यासाठी 12-14 जागा सोडतील असे पक्षाला वाटत होते, पण सपा-बसपा-लोकदल यांच्यात युती होऊन, फक्त अमेठी-रायबरेलीच्या दोन जागा कॉंग्रेससाठी सोडण्यात आल्यानंतर कॉंग्रेसची फार मोठी कोंडी झाली होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 21 जागा जिंकणार्‍या कॉंग्रेससाठी एवढा मोठा अपमान पचविणे जड होते. कॉंग्रेस 15-20 जागांवर आपले उमेदवार उभे करील, असा एक अंदाज वर्तवला जात होता. मात्र, राहुल गांधी यांनी, प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणून त्यांच्याकडे पूर्व उत्तरप्रदेशाची जबाबदारी सोपवून एक मोठा धक्का सर्वांना दिला आहे. कारण, त्यांच्या या निर्णयात एक मोठी राजकीय जोखीमही आहे. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे मतदारसंघ पूर्व उत्तरप्रदेशात आहेत. म्हणजे एकप्रकारे मोदी-योगी यांना आव्हान देण्याचे कामही त्यांच्याकडे देण्यात आले आहे. प्रियांका गांधी यात कितपत यशस्वी होतील, या प्रश्नाचे उत्तर लोकसभा निवडणुकीचे निकाल देणार आहेत. प्रियांका गांधी यांच्यात राजकीय गुण आहेत असे म्हटले जात होते. त्याची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे.
 
प्रियांका गांधी यांच्या राजकारणप्रवेशाची घोषणा झाली त्याच दिवशी एक जनमत चाचणी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात उत्तरप्रदेशात भाजपाला 80 पैकी 18 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सपा-बसपा युतीत कॉंग्रेसही सामील झाल्यास भाजपाला 80 पैकी फक्त 5 जागा मिळण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. मात्र, प्रियांका गांधी यांच्या राजकारणप्रवेशाने राज्याचे राजकारण बदलले आणि दुरंगी लढतीऐवजी तिरंगी लढत होईल व याचा फायदा भाजपाला मिळेल, असा अंदाज भाजपावर्तुळात वर्तविला जात आहे. प्रियांकाचे आगमन भाजपासाठी संधी आहे व आव्हानही आहे, असे म्हटल्यास ते योग्य ठरेल. राज्यातील प्रभावशाली मुस्लिम समाज भाजपाला मतदान करणार नाही. हा समाज एकगठ्‌ठा सपा-बसपा युतीसाठी मतदान करील असे वाटत असताना, प्रियांकाचे आगमन झाले. याने मुस्लिम समाजाच्या भूमिकेत काही बदल होईल, की स्थानिक पातळीवर मतदान करण्याचा निर्णय घेतला जाईल, हे आज सांगणे अवघड आहे.
 
दुसरा मुद्दा म्हणजे दलित समाजाचा. हा समाज मायावतींसोबत राहील असे मानले जाते, तर यादव समाज अखिलेश यादव यांच्यासोबत राहील, हे गृहीत धरले जाते. आता महत्त्वाचा प्रश्न आहे तो राज्यातील आणखी एक प्रभावी ब्राह्मण समाज. ब्राह्मण कुणाकडे जाणार, हा आहे. पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी असताना ब्राम्हण समाज कॉंग्रेसला मतदान करीत असे. नंतर कॉंग्रेसची वाताहत लागल्याने, ब्राह्मण समाज भाजपा, मायावती, अखिलेश यादव यांच्यात विभागला जाऊ लागला. बसपाने एका निवडणुकीत, ‘तिलक, तराजू और तलवार’ ही घोषणा दिली होती. आता हा समाज पुन्हा गांधी घराण्याकडे जाईल काय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ज्याचे उत्तर आजतरी देता येणार नाही. ब्राह्मण व सवर्ण समाजाने कॉंग्रेसला साथ दिल्यास, ते भाजपासाठी योग्य ठरणार नाही. मायावतींच्या विरोधात, ब्राह्मण समाजाने कॉंग्रेसला साथ दिल्यास त्याचेही परिणाम वेगळे असतील.
 
छत्तीसगढमध्ये, मायावती व अजित जोगी यांनी कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती. याची प्रतिक्रिया सवर्ण समाजात उमटली व त्यांनी कॉंग्रेसला भरभरून मतदान केले. हेच उत्तरप्रदेशात होईल काय, हाही एक प्रश्न विचारला जात आहे. प्रियांका गांधी सध्या विदेशात आहेत. त्या भारतात परतल्यावर, उत्तरप्रेदशात जातील, तेव्हा स्थानिक जनता, विशेषत: महिला, युवा त्यांना कितपत व कसा प्रतिसाद देतो, हे पाहणे आवश्यक ठरणार आहे. सपा- बसपा यांच्या जातीय राजकारणाला कंटाळलेली जनता कॉंग्रेसकडे वळेल काय, हा एक प्रश्न विचारला जात आहे. तसे झाल्यास प्रियांकाचे राजकारण भाजपाला नाही, तर सपा-बसपा यांना धक्का देणारे ठरू शकते. अर्थात हे केवळ प्रश्न आहेत, या केवळ शक्यता आहेत.
 
जनमत चाचण्या
मागील आठवड्यात काही जनमत चाचण्या प्रसिद्ध झाल्या. त्यात भाजपाच्या जागा कमी होत असल्याचे दाखविण्यात आले आहे. भाजपाला मोठा धक्का उत्तरप्रदेशात बसेल, असेही सांगण्यात आले आहे. बहुतेक जनमत चाचण्यांचे निष्कर्ष जवळपास सारखे आहेत. त्यात भाजपा 230च्या आसपास जागांवर विजयी ठरेल, असे सांगण्यात आले आहे. या जनमत चाचण्यांना आधार मानता येणार नाही. त्या नेमक्या ठरू शकतात, चुकीच्या ठरू शकतात वा चाचण्यांमध्ये जी स्थिती सांगण्यात आली आहे त्यापेक्षा कमी जागा त्या त्या पक्षांना मिळू शकतात. सध्याचे चित्र भाजपासाठी काहीसे अडचणीचे दिसत असले, तरी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यामुळे हे चित्र बदलू शकते, असे भाजपा नेत्यांना वाटते. भाजपा नेते अद्यापही 350 चा आकडा गाठण्याची शक्यता वर्तवीत आहेत. यात उत्तरप्रदेशात 75 तर महाराष्ट्रात युती झाल्यास 40 जागांचा अंदाज सांगितला जात आहे.
 
सीबीआय प्रमुखांची निवड
सीबीआयचा नवा संचालक निवडण्यासाठी 24 जानेवारीला झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. या बैठकीत 80 नावांवर चर्चा झाल्याचे समजते. हा एक रेकॉर्ड मानला जाईल. आता या बैठकीची नव्याने तारीख घोषित केली जाईल. त्यातही पंतप्रधान, विरोधी पक्षनेता व सरन्यायाधीश यांना मान्य होईल असे नाव निश्चित होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे समजते. दरम्यान, हंगामी संचालक नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला आव्हान देणार्‍या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल होत आहेत. यात सीबीआयच्या कामाचे काय होत असेल, हे फक्त परमेश्वरालाच ठाऊक!