अंबाती रायुडूच्या गोलंदाजीवर आयसीसीची बंदी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019
मुंबई :
भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडूला गोलंदाजी करण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बंदी घातली आहे. अंबातीच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यानंतर नियमाप्रमाणे त्याने १४ दिवसांमध्ये आयसीसीसमोर गोलंदाजीची चाचणी देणे आवश्यक होते. मात्र, चाचणी न दिल्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली असल्याचे आयसीसीने म्हटले.

 
 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अंबातीने फिरकी गोलंदाजी केली होती. अंबातीच्या गोलंदाजीत त्याच्या चेंडू फेकण्याच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवण्यात आला होता. अंबातीच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतल्याचा अहवाल भारतीय संघ व्यवस्थापनाच्या हाती आला होता. यात अंबाती रायडूच्या गोलंदाजीत चेंडू फेकण्याची पद्धत वैध आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पण चाचणीचा निकाल येईपर्यंत अंबातीला सामन्यात गोलंदाजी करता येणार होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये अंबातीच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली असली तरी त्याला स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये गोलंदाजी करता येणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.