भारताची मालिकेत विजयी आघाडी;तिसऱ्या सामन्यात 7 गडी राखून विजयी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019
माउंट माऊंगानुई :
 
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला आहे. मोहम्मद शमीला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  या विजयासोबत भारताने ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने दिलेले २४४ धावांचे आव्हान भारताने सहज पूर्ण केले.
 
 
 
विराट आणि रोहित यांनी दुसऱ्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. रोहितने ६२ तर कोहलीने ६० धावा केल्या. त्यानंतर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिकने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने २ तर मिचेल सँटनरने १ बळी घेतले. न्यूझीलंडच्या भूमीवर विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला तब्बल एका दशकाची वाट पहावी लागली. २००८-०९ साली भारताने न्यूझीलंडमध्ये ३-१ च्या फरकाने एकदिवसीय मालिका जिंकली होती.
 
 
 
याआधी रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांनी झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने ४९ षटकांत २४३ धावांपर्यंत मजल मारली. रॉस टेलरने ९३ तर टॉम लॅथमने ५१ धावांची खेळी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कॉलिन मुनरो आणि मार्टीन गुप्टील हे सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. यानंतर कर्णधार केन विल्यमसनने काहीकाळ संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ही चहलच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला.
 

 
यानंतर रॉस टेलर आणि टॉम लॅथम जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत धावफलक हलता ठेवला. दोघांमध्येही चौथ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी रचल्यानंतर टॉम लॅथम माघारी परतला. यानंतर न्यूझीलंडचे एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतल्यामुळे भारतीय संघाने सामन्यावर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवले. भारताकडून मोहम्मद शमीने ३ बळी घेतले, त्याला हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी २-२ आणि भुवनेश्वरने १ बळी घेत चांगली साथ दिली.