भंडाऱ्यात भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019

-पवनी-निलज मार्गावरील घटना
पवनी: 
 
गिट्‌टीची वाहतूक करणार्‍या टिप्परखाली येऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पवनी-निलज मार्गावरील बेटाळा गावात घडली. या घटनेनंतर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांकडून टिप्पर जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 
 
 
 
पवनी शहरातून जाणार्‍या राज्यमार्गावरून मोठ्या प्रमाणावर रेती वाहतूक करणारे ट्रक आणि टिप्पर धावत असतात. आज दुपारच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील वायगाव येथील शामसूंदर रायपुरकर (50) व परसराम दोहतरे (65) हे दोघेजण दूचाकीने पवनीकडून गावाकडे परत जात असताना निलजकडून पवनीच्या दिशेने येणार्‍या टिप्परने त्यांच्या दूचाकीला जोरदार धडक दिली.
 
या अपघातात दुचाकीवरील दोघेजण टिप्परच्या समोरच्या चाकाखाली दबून जागीच ठार झाले. घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी टिप्पर जाळण्याचा प्रयत्न केला. यात टिप्परचे टायर जळाल्याचे समजते. त्यानंतर गावकर्‍यांनी रास्तारोको आंदोलन केले. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर व इतरांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मृतकाच्या नातेवाईकांना आर्थिक मदत आणि अवैधरित्या होणारी रेतीची वाहतुक थांबविली जावी, अशी मागणी लावून धरण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर व इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले होते.