भारतातून कापूस आयात करण्यावर चीनचा फेरविचार - अमेरिका-चीन व्यापारयुद्धाची झळ भारताला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019
नवी दिल्ली,
अमेरिका-चीन वाढत्या व्यापारयुद्धाची झळ भारताच्या कापूस क्षेत्राला बसत आहे. भारताची चीनमध्ये होणारी कापूस निर्यात यामुळे आणखी प्रभावित होण्याची शक्यता बळावली असून, कापूस आयातीसाठी मागील आठवड्यात दिलेल्या 40-50 कोटी डॉलर्सच्या ऑर्डरवर चिनी आयातदार फेरविचार करीत आहेत.
 

 
अलिकडील काळापर्यंत चीनमधील कापूस निर्यातदारांनी दिलेल्या ऑर्डरवर फेरवाटाघाटी करण्यात आणि त्या रद्द करण्यात अडचणी जात होत्या. भारतीय निर्यातदारांच्या मते, कापूस निर्यातदार यातील एजंट्‌स आणि चीनमधील बँका झालेल्या सौद्यांमध्ये दोष काढायचे, फेरवाटाघाटी करायचे. इतकेच काय तर, रवाना झालेला माल रद्द करायचे, तसेच पतपत्रही रद्द करण्याचे प्रकार 10 ते 12 कंत्राटदारांसोबत घडलेले आहेत. त्यामागील कोणतेही ठोस कारण त्यांनी दिलेले नाही.
अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्धाचा फायदा भारताला झाला आहे. जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत अमेरिकेने काही चिनी उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर लादले. चीनने अमेरिकेला तसेच उत्तर दिले. त्यामुळे याच कालावधीत भारताची चीनमधील निर्यात 32 टक्क्यांनी वाढून ती 800.46 कोटी डॉलर्सवर गेली.
 
 
यापूर्वी चीनने अमेरिकी कापसावर मोठ्या प्रमाणात कर आकारल्याने त्यांना भारतातून कापसाची आयात करण्याचा दबाव निर्माण झाला होता. मात्र, आता परिस्थिती बदलल्यामुळे चिनी आयातदार भाव कमी करून मागत आहेत. अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतीय कापूस क्षेत्राला बसलेला फटका आहे, असे भारतीय अधिकार्‍यांनी सांगितले.
चीनने अमेरिकी कापसावर 25 टक्के अतिरिक्त कर लादण्याची योजना आखली होती. मात्र, व्यापारयुद्ध सौम्य करण्यासाठी हे दोन्ही देश प्रयत्न करीत आहेत. परिणामी, अमेरिकी कापसावरील अतिरिक्त कर 1 मार्चपासून शिथिल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
भारताने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे 90.40 कोटी डॉलर्सच्या कापसाची निर्यात चीनला केली आहे. 2017-18 मध्ये केलेल्या सुमारे 87.20 कोटी डॉलर्सच्या तुलनेत ही निर्यात 2.5 टक्क्याने जास्त आहे.
अमेरिकेकडून मार्चमध्ये लागू केल्या जाणार्‍या करांच्या दुसर्‍या फेरीत पोषाखांचा समावेश केला जाणार असून, त्यामुळे स्पर्धेत मागे पडण्याच्या भीतीपोटी चीनने कापूस आयातीचे प्रमाण कमी केले आहे. आपल्याकडील माल कमी करण्याचा चीन विचार करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
 
चीन कापसाचा सर्वात मोठा आयातदार आहे. जागतिक पातळीवर हा देश 46.7 टक्के कापसाची आयात करतो, तर जागतिक पातळीवर भारत हा कापसाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे.
 
 
देशांतर्गत मागणी मंदावल्याने आणि अमेरिकेसोबत होणार्‍या कराराबाबत चिनी आयातदार साशंक असल्यानेच त्यांनी भूमिकेत बदल केला आहे, असे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक अजय सहाय यांनी सांगितले.