गोदरेज प्रॉपर्टीजला 41.63 कोटींचा नफा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019
रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी गोदरेज प्रॉपर्टीजला डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 41.63 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. घरांच्या विक्रीत झालेल्या वाढीमुळे कंपनीने चांगला नफा नोंदवला आहे. मागील वर्षी तिसऱ्या तिमाहीत गोदरेज प्रॉपर्टीजला 54.75 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीचे एकूण उत्पन्न 39.7 टक्क्यांनी वाढून 430.70 कोटी रुपयांवर पोचले आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचे उत्पन्न 308.29 कोटी रुपये होते.
 

'चालू आर्थिक वर्षातील तिसरी तिमाहीत गोदरेज प्रॉपर्टीजच्या इतिहासातील आतापर्यतची सर्वोत्तम तिमाही होती. या कालावधीत कंपनीच्या विक्रीत 89 टक्क्यांची वाढ होत 1,528 कोटी रुपयांची गृहविक्री कंपनीने केली आहे. मुंबई, एनसीआर, बंगळूरू, पुणे आणि अहमदाबादमध्ये आमचे गृहप्रकल्प यशस्वीरित्या सुरू झाले असल्याचे मत गोदरेज प्रॉपर्टीजेच कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांनी व्यक्त केले आहेत.
कंपनीच्या बुकींग झालेल्या गृहप्रकल्पांचे क्षेत्रफळ 2.80 मिलियन चौरस फूट इतके आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीच्या बुकींग झालेल्या प्रकल्पांचे क्षेत्रफळ 1.43 मिलियन चौरस फूट इतके होते. गोदरेज प्रॉपर्टीज हिरो सायकल्सबरोबर संयुक्तरित्या गुरूग्राम येथे एका प्रकल्पावर काम करते आहे.