मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात क्रांतिकारकांचा उल्लेख दहशतवादी! - अभाविपचा आंदोलनाचा इशारा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019
अमरावती, 
 
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात क्रांतिकारकांच्या चळवळीचा दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ असा उल्लेख करण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यावर आक्षेप घेऊन तत्काळ दुरुस्तीची मागणी करीत विभागीय शिक्षण संचालकांकडे निवेदन सादर केले आहे.
 
 
 
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रशासनात कार्यरत तथाकथित विद्वानांना इतिहासाचा अभ्यास असल्याचे दिसत नाही, िंकवा त्यांनी त्याकडे हेतुपुरस्सरपणे तरी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. या विद्यापीठाच्या बी. ए. द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या पुस्तकात घटक क्रमांक 04 मध्ये देशभक्त क्रांतिकारकांच्या चळवळीचा ‘दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ म्हणून उल्लेख केलेला आहे. या शब्दामुळेच वाचकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. दहशतवाद हा शब्द आज ज्या अर्थाने घेतला जातो, त्यामुळे या देशातील लोक आपल्याच स्वातंत्र्याकरिता लढलेल्या क्रांतिकारकांना अतिरेकी समजण्याची शक्यता आहे. मुक्त विद्यापीठाच्या विद्वानांच्या लक्षात ही बाब येऊ नये, याचे आश्चर्य वाटते.
 
 
या संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमरावती महानगर शाखेद्वारे शिक्षण विभागाच्या विभागीय संचालकांना नुकतेच निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
 
 
यावेळी प्रदेश सहमंत्री ज्ञानेश्वर खुपसे, महानगर सहमंत्री प्रतीक जोशी, शिवानी मोरे, मध्यभाग संयोजक आनंद बुंदेले, स्वाती कठाळे, धनश्री जोशी, रोहन देवलसे, अभिषेक काळे, महानगर संघटनमंत्री दुर्गेश साठवणे आदींची उपस्थिती होती.