भारत ठरला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक देश
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019
जपानला मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पोलाद उत्पादन करणारा देश भारत ठरला असून चीन जगातील सर्वाधिक पोलाद उत्पादन करणारा देश आहे. जागतिक पोलाद संघटनेनुसार चीन एकूण पोलादाच्या 51 टक्के पोलादाचे उत्पादन करतो. जागतिक पोलाद संघटनेच्या अहवालानुसार चीनच्या पोलाद उत्पादनात 6.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2017 मध्ये चीनचे पोलाद उत्पादन 870.9 मिलियन टन होते. 2018 मध्ये ते वाढून 928.3 मिलियन टनांवर पोचले. जगातील पोलाद उत्पादनाच्या 51.3 टक्के पोलाद उत्पादन एकट्या चीनने 2018 मध्ये केले आहे.

 
तर भारताचे 2018 मधील पोलाद उत्पादन 2017 च्या तुलनेत 4.9 टक्क्यांनी वाढले आहे. 2017 मध्ये भारताने 101.5 मिलियन टन पोलादाचे उत्पादन केले होते तर 2018 मध्ये वाढून भारताचे पोलाद उत्पादन 106.5 मिलियन टनांवर पोचले आहे. यामुळे भारताने जपानला मागे टाकून पोलाद निर्मितीत जगात दुसरा क्रमांक मिळवला आहे. जपानने 2018 मध्ये 104.3 मिलियन टन पोलाद उत्पादन केले होते.
जपाननंतर चौथ्या क्रमांकावर अमेरिका, पाचव्या क्रमांकावर दक्षिण कोरिया, सहाव्या क्रमांकावर रशिया, सातव्या क्रमांकावर जर्मनी, आठव्या क्रमांकावर टर्की, नवव्या क्रमांकावर ब्राझिल आणि दहाव्या क्रमांकावर इराण आहे.