इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेने गाठला 1.25 लाख शाखांचा पल्ला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019
केंद्र सरकारने देशभरात इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेच्या 1.25 शाखा उघडल्या आहेत. लवकरच इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेच्या शाखांची संख्या 1.5 लाखांवर नेली जाणार आहे. केंद्रीय माहितीसंपर्क मंत्री मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 सप्टेंबर 2018 ला इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे उद्घाटन केले होते. तीन लाख पोस्ट कर्मचाऱ्यांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात आले होते. आर्थिक सेवांचे डिजीटल सक्षमीकरण करण्यासंदर्भात हे पाऊल उचलण्यात आले होते. इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेत 1 लाख रुपयांपर्यतच्या ठेवी ठेवता येतात.
 

 
यात मोबाईल पेमेंट्स, ट्रान्सफर, पर्चेसेस तसेच एटीएम, डेबिट कार्ड, नेट बॅंकिंग आणि थर्ड पार्टी ट्रान्सफर यासारख्या सुविधांही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेद्वारे क्रेडिट कार्ड दिले जात नाहीत, त्याचबरोबर कोणतेही कर्ज दिले जात नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशभरात 1.30 लाख बॅंक शाखा होत्या. त्यामुळे त्यापेक्षा अधिक बॅंक शाखा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.