नेताजींना खर्‍या अर्थाने देशासमोर मोदींनी आणले - चंद्रकुमार बोस यांचे प्रतिपादन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019
वणी,
स्वातंत्र्य संग्रामातील सेनापती सुभाषचंद्र बोस यांचे अद्वितीय योगदान आहे. त्यांनी केलेले कार्य हे स्वप्नवत आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक नेताजींच्या योगदानाला जगापुढे येऊ दिले नाही. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर आझाद िंहद सेनेला व नेताजींना खर्‍या अर्थाने देशासमोर आणण्याचे मोठे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असे गौरवोद्‌गार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वंशज चंद्रकुमार बोस यांनी काढले. येथील नेताजींच्या पुतळ्यासमोर आयोजित सन्मान समारंभात ते बोलत होते.
 

 
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त नेताजींच्या वंशजांचा सन्मान करण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पुढाकार घेऊन त्यांचा वणीत सन्मान समारंभ आयोजित केला होता. नेताजींच्या वंशजांचे वणीत आगमन होताच भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांची शहरातील मुख्य रस्त्यावरून मोटार सायकल रॅली काढून त्यांना अभिवादन केले.
 
 
या प्रसंगी पुतळ्यासमोर आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डांगे, वणी नगर परिषद अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपाचे दिनकर पावडे, विजय पिदुरकर, नपचे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, भाजपाचे शहर अध्यक्ष रवी बेलुरकर व येथील पुतळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
हंसराज अहिर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेत्रदीपक गौरवशाली कार्याचा उल्लेख करून चंद्रकुमार बोस यांचा सत्कार केला. याप्रसंगी संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेंद्र डांगे, तारेंद्र बोर्डे व पुतळा समितीच्या पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रवी बेलुरकर यांनी केले.