'झी'च्या सुभाष चंद्रांनी मागितली गुंतवणूकदारांची माफी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :28-Jan-2019
मुंबई,
झी आणि एस्सेल समूहाचे सर्वेसर्वा सुभाष चंद्रा यांनी सर्व गुंतवणूकदार आणि बँकांची माफी मागितली आहे. सध्या झी समूहाची परिस्थिती नाजूक आहे, असे मान्य करत चंद्रा म्हणाले की, गेल्या 52 वर्षात प्रथमच मला आर्थिक क्षेत्रातील संस्था, बँका, म्युच्युअल फंड कंपन्यांची माफी मागावी लागते आहे. मात्र प्रत्येकाचे कर्ज मी फेडणार आहे.
 

मी प्रत्येकाचा पै-पै परत करणार आहे. एस्सेल इन्फ्राच्या विक्रीच्या वेळेस आमच्यकडून काही चुका घडल्या. डीटीएचचा व्यवहार देखील महागात आहे.'' असे चंद्रा यांनी सांगितले. शुक्रवारी एस्सेल समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये 18 ते 21 टक्क्यांची मोठी घसरण झाली. गुंतवणूकदारांनी देखील शेअर विक्रीचा मारा केल्याने सुमारे 14 हजार कोटी रुपयांचे बाजारभांडवल स्वाहा झाले आहे.
शुक्रवारी झी एंटरटेनमेन्टच्या शेअरमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. आज (सोमवार) झी एंटरटेनमेन्टचा शेअर 13.53 टक्क्यांनी वधारला असून तो 362.55 रुपयांवर व्यवहार करतो आहे. मात्र झी मीडियाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. झी मीडियाच्या शेअरमध्ये 19.91 टक्क्यांची घसरण झाली असून तो 17.70 रुपयांवर व्यवहार करतो आहे.