श्रीकैलास आम्हाला पावला!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
‘श्रीकैलास-मानसदर्शन’ प्रत्येकच भारतीयाची सुप्त इच्छा-आकांक्षा! काही दशकांपूर्वी याचे उत्तर, ‘सर्वकाही भोलेबाबाच्या मर्जीवर!’ आज ही यात्रा आता पूर्वीइतकी खडतर राहिलेली नाही. तुमच्या पोटातील पाणीदेखील न हलता श्रीकैलास-मानस सरोवर यात्रा पूर्ण होते. ते कसं काय? ऐका...
या यात्रेची बीजं मनात खूप खोलवर रुजलेली होती. भगवान श्रीशंकराला एकच साकडं घातलं, तुझी सर्व रूपे बघितली. श्रीपशुपतीनाथाचेही दर्शन घेतले. आता फक्त एकच आस आहे, तुझं शांत-सौम्य-सोज्ज्वळ-प्रसन्न रूप बघण्याची, अनुभवण्याची! ‘याचि देही याचि डोळा’ शरीराच्या रोमारोमात, अंतर्बाह्य मनाच्या गाभार्‍यात सामावण्याची!
 
...आणि त्याने आमची आर्त हाक ऐकली. भगवान श्रीशंकर आणि आमच्यातील दुवा आहेत आदित्य व पद्मा गुप्ता, ईश्वर (एबीसी अॅडवेंचर ग्रुप) नेपाळगंज आणि त्यांचे सहकारी शेर्पा. आपल्या यात्रेत मोलाची मदत करणारे आणि आपली सर्वतोपरी काळजी घेणारे समस्त शेर्पा बांधव. व्हिसाचे सर्व सोपस्कार गुप्तांनी चोखपणे केल्याने कुठलीच काळजी नव्हती.
दि. 20 जून 2018... दुपारी 1 वाजता नागपूरहून दिल्लीला विमानाने प्रयाण केले. तेथून 4 वाजता विमानानेच लखनौला प्रयाण. (लखनौपर्यंत रेल्वेने जाऊ शकता.) लखनौला रात्रभर हॉटेलमध्ये राहून सकाळी टॅक्सीने नेपाळगंजला जाण्यासाठी निघालो. 4 तासांत नेपाळगंजला पोहोचलो. नेपाळगंजला ईश्वर भेटले. गुप्तांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सामान जवळ असल्याने नेपाळला िंकवा पुढेही काही विकत घ्यावे लागले नाही. नेपाळगंजला भारतभरातून वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे लोक येतात. आता पुढचा प्रवास एबीसी अॅडव्हेंचर ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली सुरू होतो. 50 जणांची एक तुकडी याप्रमाणे पुढील प्रवास सुरू होतो. आमच्यासोबत मुंबईचा मैत्री ग्रुप, औरंगाबादचा हेरंब ग्रुप, पुण्याहून 10 जण आले होते.
 
महादेवन्‌ हे त्रिचनापल्लीहून एकटेच होते. नेपाळगंजच्या हॉटेलमध्ये रात्रभर मुक्काम करून सीमीकोट येथे पोहोचायचे होते. तत्पूर्वी ईश्वर यांच्या सूचनेनुसार आपल्या बॅग्ज नेपाळगंजला हॉटेलमध्येच ठेवून, त्यांनी दिलेल्या बॅग्ज आणि विंडशिटर सोबत घेतले. दुसर्‍या दिवशी सकाळी नेपाळगंज विमानतळावर पोहोचलो. नाश्ता सोबत दिलेला होता. 12 सीटर विमानाने सीमीकोटला पोहोचलो. तिथे एक रात्र मुक्काम करून (िंकवा लगेचच, वातावरणानुसार) हिल्सा येथे निघालो. येथे ‘कर्नाली’ नदी ओलांडून ‘तिबेट’मध्ये प्रवेश केला. (आता तिबेट चीनच्या ताब्यात असल्याने पुढचे सर्व सोपस्कार चीन सरकारकडून केले जातात.) पासपोर्ट चेिंकगचे सोपस्कार आटोपून बसने तवलकोट (पुरांग) येथे प्रयाण. दोन रात्री आपल्याला येथे मुक्काम करावा लागतो. आपण तिथल्या वातावरणाशी जुळण्यासाठी इथल्या नेपाळी मार्केटमध्ये यात्रेला लागणारे सर्व सामान मिळते. उदा. काठी, मानससरोवरातील पाणी आणण्यासाठी पाण्याची डबकी इत्यादी. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर श्रीकैलासदर्शनासाठी बसने निघालो. सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली होती आणि दीड तासांनी कैलासदर्शन झाले. मन आणि आत्मा-गात्रन्‌गात्र तृप्त झाले. कृतकृत्य झाले. शरीरावर रोमांच उठले. निळेभोर आकाश... त्याच्या पार्श्वभूमीवर शांत-स्थितप्रज्ञ तरीही युगानुयुगे आपलाच वाटणारा प्रसन्न कैलास! खरंच अद्भुत! अविस्मरणीय! शब्द जिथे मूक होतात आणि चालतो तो ‘जिवाचा आणि शिवाचा!’ आपण ‘कोऽहम्‌चे सोऽहम्‌’ कधी होतो ते कळतच नाही. अचानक गाडीचे ब्रेक लागतात आणि टूर ऑपरेटर सांगतो, आता आपण राक्षसतालपाशी पोहोचलो आहोत! एका वेगळ्याच मन:स्थितीत गाडीतून उतरतो. समोर राक्षसतालचे स्वच्छ निळे
शार पाणी आणि समोर दिसतो तो पांढराशुभ्र कैलास! कर्पुरगौर!! आणि बरोब्बर राक्षसतालसमोर नतमस्तक अवस्थेतील श्रीमांधाता पर्वत, शुभ्र बर्फाने आच्छादलेला. अशी आख्यायिका आहे, राक्षसताल रावणाच्या हृदयापासून तयार झाले आहे. मांधाता राजाने भगवान श्रीशंकराची तपस्या इथेच केली. इथले वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूच्या इतर कोणत्याही पर्वतावर बर्फ नव्हता. फक्त श्रीकैलासावर आणि मांधातावरच बर्फ होता. लख्ख पांढराशुभ्र! इथे जाणवलीत श्रीशिवाची स्पंदनं! 84 लक्ष योनींच्या नंतर मिळणार्‍या मानवी जीवनाचे साफल्य! आयुष्यातील सर्व इच्छापूर्तीचे आनंदधाम! ही मनाला हवीहवीशी वाटणारी प्रसन्न-शांत-सात्त्विक पण तितकीच अलवार... शब्दांच्या पलीकडे आहे हो याचं उत्तर! हा अनुभव ज्याचा त्यानीच घ्यायचा आहे.
 
‘‘चला, परत गाडीत बसा.’’, टूर ऑपरेटरच्या आवाजाने भानावर आलो. लगेचच मानससरोवराकडे आगेकूच केली. मानससरोवराकाठी नकळत सर्वार्थाने षड्‌विकार गळून पडतात. मानससरोवराचे स्वच्छ सुंदर, अतिशय मधुर,थंडगार गोड पाणी. पाण्यासाठी असणारी समस्त विशेषणेही कमीच पडावीत असे ते प्रदूषणरहित स्वच्छ, सुंदर, निर्मळ, पवित्र जल! मानससरोवराच्या जलाने स्नान करून, पूजाअर्चा केली. नंतर पोटपूजा करून मानससरोवराच्या परिक्रमेला बसमधूनच सुरुवात केली. या प्रदक्षिणेला दोन ते सवादोन तास लागतात. प्रदक्षिणेदरम्यान मध्येच थांबून मानससरोवराचे जल भरून घेतले. इथेच आम्हाला भगवान श्रीशंकराने चांदीच्या बेलपत्राच्या रूपाने भरभरून ‘प्रसाद’ दिला! कृतकृत्य झालो!
त्यानंतरचा मुक्काम दास्वेन येथे. येथून श्रीकैलासपरिक्रमा सुरू होते. या परिक्रमेचा खर्च आपल्याला वेगळा करावा लागतो. पायी िंकवा घोड्यावरूनही ही परिक्रमा करता येते. परिक्रमेदरम्यान काही त्रास झाल्यास ऑक्सीजन सिलेंडर मिळते तसेच अॅम्ब्युलन्सचीही सोय आहे. तीन दिवसांनी ही परिक्रमा पूर्ण होते. या परिक्रमेचा अनुभवसुद्धा तितकाच रोमांचकारी आणि अविस्मरणीय होता. येथून पुढे आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. मन भरून येतं. पाय निघत नाही, पण परतावं लागतं. यात्रेदरम्यान राहण्याची आणि जेवणाची उत्कृष्ट सोय आहे. भारतभरातून लोक येत असल्याने रस्सम-सांबापासून दालबाटी-चुरमापर्यंत सर्व पदार्थ मिळतात. अगदी लसणाची चटणीसुद्धा!
श्रीकैलासाचे दर्शन झाल्यावर अनन्यभावे शरणागत होऊन नकळत म्हटले जाते-
कैलासराणा शिवचंद्र मौळी।
फणींद्रमाथा मुकुटी झळाळी।।
कारुण्यिंसधू भवदु:ख हारी।
तुजवीण शंभो मज कोण तारी।।