युरोप
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
परदेशगमन हे एकेकाळी फक्त कोणाकडून ऐकलेलं िंकवा पुस्तकातून वाचलेलं. मला प्रत्यक्ष हा योग येईल असं वाटलं नव्हतं. आणी पाहता पाहता माझी चौथी परदेशवारी झाली.
सिनीक युरोप-
एमिरेटसचे विमानाने तेथील वेळेनुसार चार वाजता हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्टला पोहोचलो. युरोपच्या धरतीवर पाऊल ठेवले. मनोमन खूप आनंदित झालो होतो.
बुडा-पेस्ट ही डेन्युब नदीच्या दोन तीरावर वसलेली दोन वेगळी शहरे बुडा व पेस्ट अशी आहेत, हे आतापर्यंत माहिती नव्हते. परंतु, आता दोन्ही एकच झाली आहेत.
 
बुडापेस्टला वातावरण थंडगार होते. तापमान दिवसा 7-8 डिग्री व रात्री 2- डिग्री! दुपारी 4:30 वाजताच सूर्यास्त व्हायचा व आपल्याकडे रात्री 8 वाजता पडतो तसा काळोख पडायचा.
डेन्युब नदी ही युरोपमधील दुसर्‍या क्रमांकाची मोठी नदी आहे. सकाळी प्रथम कॅसल पहायला गेलो. वास्तुकलेचे उत्तम उदाहरण! किती पाहू, किती नजरेत साठवू असं झालं. हिरोज स्क्वेअरमधील वास्तुकाम हेसुद्धा डोळ्याचे पारणं फेडणारेे. बुडापेस्टमधील सर्वात मोठा व आकर्षक असा हा चौक. ब्रॉंझचे विविध पुतळे व चौकाच्या बाजूस फाईन आर्ट म्युझियम व मधोमध मिलेनियम मॉन्युमेंट टॉवर केवळ अप्रतिम!

 
 
संध्याकाळी एक तासाची क्रूझराईड असल्याने आम्ही सर्वजण स्पॉटवर पोहोचलो. अंधार पडल्याने सर्व परिसर दिव्यांच्या प्रकाशात झगमगत होता. वाईनचा आस्वाद घेत, फोटो, व्हिडीओ काढत क्रूझमधील प्रवासाचा 1 तास कधी संपला तेच समजले नाही. डेन्युब नदीच्या दोन्ही काठावर अत्यंत सुरेख व सुस्थितीत असलेल्या ( राखलेल्या) सुंदर इमारती दिसत होत्या. दुपारी पाहिल्या होत्याच, परंतु अंधार पडल्यावर दिव्याच्या प्रकाशात अधिक मोहक दिसत होत्या. युरोप टूरचा पहिला टप्पा पार केला. पुढचा देश ‘स्लोव्हाकिया!’ बुडापेस्टचे सौंदर्य डोळ्यात वकॅमेर्‍यातही साठवून बसने आम्ही ब्राटीस्लाव्हा येथे जाण्यास निघालो. साडेतीन तासांच्या प्रवासानंतर दुपारी ब्राटीस्लाव्हाला पोहोचलो. या ऐतिहासिक शहरातून पायी फिरत फिरत, माहिती देत सर्व प्रसिद्ध स्थळांची भेट गाईडने घडविली. सेंट मार्टिन्स कॅथेड्रल चर्च पाहिले. सर्वात जुने व मोठ्या चर्चपैकी असलेल्या या चर्चमध्ये प्राचीन काळी हंगेरीयन राजांचे राज्याभिषेकही होत असत. युरोपमधील प्रसिद्ध मारीया थेरेसा या राणीचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला होता. त्यानंतर माईकेल गेट्‌सकडे निघालो. मुख्य शहराच्या प्रवेशासाठी असलेल्या अनेक गेटपैकी केवळ हेच एक गेट सुस्थितीत आहे. वाटेत दुतर्फा रेस्टॉरंटस, कॅफेज, भेटवस्तूंची दुकाने होती. एक मजेशीर असं ब्रॉंझचं शिल्प रस्त्यावर फिशरमन गेटपाशी दिसले. रस्त्यात ड्रेनेजच्याा खड्‌ड्यासारखा अर्धवट खड्डा आहे आणि एक माणूस त्यात बसून समोर येणार्‍या जाणार्‍या पर्यटकांकडे पाहतोय्‌, असं शिल्प आहे. त्याच्या बाजूला ‘मॅन अॅट वर्क’ असा बोर्डही आहे. पण केवळ पर्यटकांचे आकर्षण यापलीकडे त्याला खास इतिहास नाही. याच रस्त्यावर संगीतप्रेमी रसिकांसाठी गाणी/संगीताचे कार्यक्रम आजही होतात, असा हॉल आहे. ज्या ठिकाणी पूर्वी त्या भागातील नामवंत संगीतकार राहिलेे, शिकले, त्यांचे कार्यक्रमही झाले असा हॉल!

 
 
पुढच्या दिवशी सकाळी आम्ही कॅसलजवळ पोहोचलो. अत्यंत देखणी इमारत आमचे स्वागतास उभी होती. डेन्युब नदीजवळ एका टेकडीवर ही आयताकृती अशी इमारत आहे. ज्याच्या चारही बाजूस टॉवर आहेत.
आत पाहण्यासारखे संग्रहालय आहे. एका टॉवरवर आतूनच सुमारे 80-90 पायर्‍या चढून वर गेल्यास संपूर्ण शहराचे सौंदर्य तुम्हाला पाहता येते, तेही अगदी 360 अंशात! ही डोळ्याचे पारणे फेडणारी उत्तम जागा आहे. अत्यंत सुंदर, स्वच्छ व शिस्तप्रिय अशा देशांचा दौरा जीवनातील अविस्मरणीय अनुभव होता, हे निश्चित!