भारतीय महिला संघानेही जिंकली वन-डे मालिका
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
माऊंट माऊंगानुई : 
 
प्रभावी वेगवान मार्‍यानंतर सलामी फलंदाज स्मृती मंधानाने केलेल्या शैलीदार फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध दुसर्‍या वन-डे सामन्यात ८ गड्यांनी विजय नोंदविला.
या विजयाबरोबरच भारतीय महिला संघाने २-० अशी विजयी आघाडी मिळविली व २४ वर्षांनंतर न्यूझीलंडच्या भूमीत वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 
 

 
न्यूझीलंडला ४४.२ षटकात १६१ धावात गुंडाळल्यानंतर भारताने ३५.२ षटकात २ गडी गमावित विजयी लक्ष्य गाठले. पहिल्या सामन्यात शतक झळकावणार्‍या स्मृती मंधानाने पुन्हा एकदा शैलीदार फलंदाजी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. तिला कर्णधार मिताली राजची उत्तम साथ मिळाली. सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरलेल्या स्मृती मंधानाने ८३ चेंडूत १३ चौकार व एक षटकारसह नाबाद ९० धावांची, तर कर्णधार मितालीने १११ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांच्या साह्याने नाबाद ६३ धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी नाबाद १५१ धावांची जबरदस्त भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.
 
 
 
सलामी फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज (१) व दीप्ती शर्मा (८) लवकरच बाद झाल्यामुळे भारताची अवस्था २ बाद १५ धावा अशी झाली होती, मात्र त्यानंतर स्मृती व मितालीने भारताला विजयश्री मिळवून दिली.
 
 
 
तत्पूर्वी, न्यूझीलंडचा डाव १६१ धावात गुंडाळताना अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामीने २३ धावात ३ बळी, तर एकता बिष्ट , दीप्ती शर्मा व पूनम यादवने प्रत्येकी दोन बळी टिपले. न्यूझीलंडकडून  ॲमी सॅटरवेटने ७१ धावांची खेळी केली.
१९९५ मध्ये भारतीय महिलांनी न्यूझीलंडमध्ये मालिका जिंकली होती. त्यानंतर २००५-०६ मध्ये न्यूझीलंडने ४-१ अशा फरकाने भारतीय संघाला पराभूत केले होते.