वसंत आबाजी डहाके यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'जनस्थान' पुरस्कार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
मुंबई :
साहित्य क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'जनस्थान' पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना जाहीर करण्यात आला आहे. वसंत आबाजी डहाके हे मराठीचे भाषातज्ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत. मराठी भाषा दिन म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
 
 
 
संजय भास्कर जोशी, सदानंद बोरसे, मोनिका गजेंद्र गडकर, विलास खोल, रेखा इनामदार साने हे सदस्य असलेल्या निवड समितीच्या बैठकीत एकमताने डहाके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. वसंत डहाके यांचे शुभवर्तमान, चित्रीलिपी, वाचाभंग हे कविता संग्रह, तर अधोलोक, प्रतिबद्ध, मर्त या कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत. तसेच यात्रा, अंतरयात्रा, मालटेकडीवरून हे लेख संग्रह प्रसिद्ध आहेत.
 
1966 साली ‘योगभ्रष्ट’ या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. ‘चित्रलिपी’ या संग‘हाकरिता 2009 सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. फेब्रुवारी 2012 च्या चंद्रपूर येथे झालेल्या 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.