जेव्हा पंतप्रधानांनीच विचारले, तुमचा मुलगा पबजी खेळतो का?
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
नवी दिल्ली :
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या मनात तयार होणारी भीती घालवण्यासाठी पंतप्रधान मोदी देशभरातील विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला. 'परीक्षा पे चर्चा २.०' या कार्यक्रमांतर्गत लाईव्ह व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअममध्ये प्रत्यक्षात त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका महिलेने पंतप्रधान मोदींना विचारलेल्या प्रश्नाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमादरम्यान एका महिलेने माझा मुलगा अभ्यासात लक्ष देत नसून मोबाईलवर सतत गेम खेळत असल्याची तक्रार थेट पंतप्रधानाकडे केली. मूळच्या आसामच्या आणि सध्या दिल्लीत राहणाऱ्या मधुमिता सेन गुप्ता यांच्या या प्रश्वावर मोदींनीसुद्धा मिश्कीलपणे उत्तर दिले. तुमचा मुलगासुद्धा पबजी खेळतो का? की त्याला फ्रंटलाईनची आवड आहे, असा प्रतिप्रश्न खुद्द पंतप्रधानांनी केल्यावर सभागृहात एकच हशा पिकला. मुलांना तंत्रज्ञानापासून लांब न नेता त्यांना त्याचे फायदे व तोटे समजावून देणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी व शिक्षकांना याबाबतीत विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, असे आवाहन मोदींनी यावेळी केले.
 

 
सध्या तरुणाईला पबजी या  गेमने अक्षरश: वेड लावले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते अगदी नोकरी करणाऱ्या तरुणांनाही या गेमने वेड लावले आहे. मुले दिवसभर या गेममध्ये रमत असल्याने पालकांचीही चिंता वाढली आहे. गेमच्या वाढत्या व्यसनाचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. मुलांना गेम खेळण्याबरोबरच मोबाईलचे इतरही फायदे पटवून देणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान या कार्यक्रमात म्हणाले.