टी-२० विश्वचषकाचा कार्यक्रम जाहीर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
सिडनी:
 
आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट २०२० स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. प्रथमच पुरुष व महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा एकाच वर्षी वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार होणार आहेत. महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा २१ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्चला मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. पुरुषांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेत १२ संघांमध्ये जेतेपदाची चुरस रंगणार आहे. ऑस्ट्रेलियातील ८ शहरांमधील १३ स्टेडियम्सवर दोन्ही विश्वचषकाचे सामने खेळवण्यात येणार आहेत.
 
 
 
पुरुषांच्या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना २४ ऑक्टोबर रोजी पर्थ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे, तर महिलांचा पहिला सामना २१ फेब्रुवारी रोजी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
 
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने २०१०,२०१२,२०१४,२०१८असे चारवेळा, २००९ साली इंग्लंड, तर २०१६ साली वेस्ट इंडीजने विश्वविजेतेपदाचा मान मिळविला आहे.
 
 
प्रथमच भारत-पाक साखळी
फेरीत आमने-सामने नाही
 
आयसीसी २०२० टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रथमच साखळी गटात भारत व पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकणार नाही. २०११च्या वन-डे विश्वचषक स्पर्धेनंतर प्रथमच असे घडत आहे.
आयसीसीच्या स्पर्धेत भारत-पाक पाचवेळा समोरासमोर आले व २०१९च्या विश्वचषकातही ते एकमेकांना भिडणार आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियात होणार्‍या २०२०च्या टी-२० विश्वचषकात उभय संघ साखळीत समोरासमोर येण्याची शक्यता नाही.
आयसीसी टी-२० क्रमवारीत पाकिस्तान आणि भारत अनुक्रमे पहिल्या व दुसर्‍या स्थानावर आहेत. त्यामुळे या संघांना दोन वेगवेगळ्या गटात स्थान देण्यात आले आहे.
 
महिला संघाची गटवारी
गट अ : ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, पात्रता फेरीतील संघ
गट ब : इंग्लंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, पात्रता फेरीतील संघ
 
भारतीय महिलांच्या सामन्याचा कार्यक्रम (भारतीय  प्रमाणवेळेनुसार)
  
 दिनांकसामना   वेळ ठिकाण  
 २१ फेब्रुवारी भारत वि. ऑस्ट्रेलिया  दुपारी १.३० वा. सिडनी
 २४ फेब्रुवारी भारत वि. पात्रता फेरीतील संघ सायं. ४.३० वा. पर्थ
  २७ फेब्रुवारी भारत वि. न्यूझीलंड सकाळी 8.30 वा. मेलबर्न
  २९ फेब्रुवारी भारत वि. श्रीलंका सकाळी 8.30 वा. मेलबर्न
 
पुरुष संघाची गटवारी
गट अ : पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, पात्रता फेरीतील 2 संघ
गट ब : भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, पात्रता फेरीतील 2 संघ
 
भारतीय पुरुष संघाच्या सामन्यांचा कार्यक्रम (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
 
  दिनांक सामना  ठिकाण
 24 ऑक्टोबर भारत वि. दक्षिण आफ्रिका पर्थ
 29 ऑक्टोबर भारत वि. पात्रता फेरीतील अ-2 संघ मेलबर्न
 1 नोव्हेंबर भारत वि. इंग्लंड मेलबर्न
 5 नोव्हेंबर  भारत वि. पात्रता फेरीतील ब-1 संघ ॲडिलेड
 8 नोव्हेंबर भारत वि. अफगाणिस्तान सिडनी