ऍक्सिस बँकेच्या नफ्यात वाढ, एचडीएफसीत घट
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
मुंबई,
अॅक्सिस बॅंकेने डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 1,680.85 कोटी रुपयांचा दणदणीत नफा कमावला आहे. बॅंकेच्या नफ्यात घसघशीत 131 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी तिसऱ्या तिमाहीत अॅक्सिस बॅंकेला 726.44 कोटी रुपयांचा नफा झाला होता. विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा जास्त चांगली कामगिरी अॅक्सिस बॅंकेने करून दाखवली आहे. विश्लेषकांनी 1,251 कोटी रुपयांच्या नफ्याचा अंदाज वर्तवला होता.

 
 
 
अॅक्सिस बॅंकेचे निव्वळ व्याजातून मिळालेले उत्पन्न 5,603.67 कोटी रुपये इतके आहे. यात 18.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बॅंकेला व्याजातून 4,731.52 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्याशिवाय बॅंकेला मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नातही 54.3 टक्क्यांची वाढ होत ते 4,000.69 कोटी रुपयांवर पोचले आहे. बॅंकेचे एनपीएसुद्धा 23.42 टक्क्यांनी वाढून 30,854.67 कोटी रुपयांवर पोचले आहे. मागील वर्षी याच कालावधीत बॅंकेचे एनपीए 25,000.51 कोटी रुपये होते. मुदतठेवींमध्ये 25.71 टक्क्यांची वाढ झाली आहे.
 
 
 
एचडीएफसीच्या नफ्यात 60 टक्क्यांची घसरण
हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनला (एचडीएफसी) चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 2,114 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. एचडीएफसीच्या निव्वळ नफ्यात 60 टक्क्यांची घट झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 5,300 कोटी रुपयांचा नफा झाला होता. एचडीएफसीच्या महसूलात मात्र वाढ झाली आहे.
 
 
एचडीएफसीला तिसऱ्या तिमाहीत 10,450 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीला 8,679 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. एचडीएफसीने 45,000 कोटी रुपयांच्या नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्सना परवानगी दिली आहे. एचडीएफसीच्या एनपीएचे प्रमाण सप्टेंबरअखेर 1.13 टक्के होते ते डिसेंबरअखेर वाढून 1.22 टक्क्यांवर पोचले आहे.