गुप्त माहिती चोरल्याचा अमेरिकेचा चीनी कंपनीवर आरोप
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
 
 
 

 
 
 
नवी दिल्ली:
 
चीनमधील हुवेई या लोकप्रिय दूरसंचार कंपनीने व्यापारासंबंधी गुप्त माहिती चोरल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टीसने सोमवारी हुवेईच्या विरोधात दोन प्रकरणे समोर आणताना अनेक आरोप केले आहेत.
या कंपनीने टी-मोबाईलच्या (टीएमयुएस) व्यापाराची गुप्त माहिती चोरण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांना माहिती पुरविण्याचे आश्वासन देऊन कर्मचार्‍यांना बोनस देण्याचे आश्वासन दिला असल्याचाही आरोप अमेरिकेने केला आहे. याशिवाय इराणवर अमेरिकेचे निर्बंध बोगस असल्याचेही कंपनी सांगत असल्याचा आरोप केला गेला आहे.
 
अमेरिकेच्या या आरोपामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जर हा वाद जास्त चिघळला तर दोन्ही देशांमधील व्यापार परिषदेचे आयोजन अडचणीत येऊ शकते, असेही बोलले जात आहे. दोन्ही देशांमध्ये 30 व 31 जानेवारीला व्यापार परिषद होणार आहे. आमच्या या आरोपामुळे व्यापार परिषदेवर त्याचा परिणाम होणार नाही, असा विश्वास अमेरिकेने व्यक्त केला आहे.
 
या प्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना चीनने म्हटले आहे की, अमेरिकेने राजकीय उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, अमेरिका गेल्या अनेक दिवसांपासून काही कंपन्यांना लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
 
विशेष उल्लेखनीय म्हणजे हुवेई आणि कंपनीचे वित्त अधिकारी मेंग वानझोऊ यांच्यावर आर्थिक घोटाळ्यासह 13 आरोप लावण्यात आले आहेत. अमेरिकेसह फ्रान्स आणि इतरही पाश्चिमात्य देशांनी शक्यता वर्तविली आहे की, हुवेईचे बेस स्टेशन आणि अन्य उपकरण चीनला जगभरातील महत्त्वपूर्ण नेटवर्कचा मुलभूत ढांचा एक्सेस म्हणून देत आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यामुळे अशी शक्यता निर्माण होते की, त्यामुळे चीनला दुसर्‍या देशांच्या सरकारवर लक्ष ठेवण्याची संधी मिळते.