‘आधार’च्या माहितीचा दुरुपयोग- एसबीआयचा आरोप
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
चंदिगड,
एसबीआय बँकेत इतर बँकांप्रमाणे आधारसाठी नोंदणी करण्यात येते. यासाठी एफआयए टेक्नोलॉजी सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड आणि संजीवनी कन्सल्टन्ट प्रा. लिमिटेड यांना कंत्राट देण्यात आले होते. या कंत्राटदारांच्या माध्यमातून चंदिगड, हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आदींमध्ये ‘आधार’ची नोंदणी करण्यात येत होती. या एजन्सीमध्ये सुमारे 250 कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी जवळपास निम्म्या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली. त्याचा परिणाम एसबीआयकडून आधारसाठी होणार्‍या नोंदणीवर झाला.
 

 
 
हरयाणातील िंजदमध्ये विक्रमवर ‘युआयएडीए’ने कारवाई केली होती. एसबीआयच्या िंजद शाखेत आधार ऑपरेटर म्हणून विक्रम 10 हजार रुपयांच्या पगारावर कामावर होता. 26 डिसेंबर 2018 रोजी ‘युआयएडीए’ने विक्रमवर 33 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. विक्रमने खोट्या कागदपत्रांच्या आधारे 9 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2018 या कालावधीत आधार कार्ड बनवले असल्याची माहिती ‘युआयएडीए’ने दिली. यासाठी विक्रमने ‘मल्टिपल स्टेशन आयडी’चा वापर केला होता. हा पर्याय वापरल्याने लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबलेटच्या मदतीने आधारची नोंदणी करता येत होती.
 
 
मात्र, एसबीआयने नेमके यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘मल्टिपल स्टेशन आयडी’ला मंजुरी नोंदणी करणारी बँक देते. मात्र, बँकेकडून कोणतीही अशी मंजुरी देण्यात आली नव्हती. या प्रकरणी बँकेने मुंबईतील आपल्या मुख्य कार्यालयाला पत्र लिहून ‘युआयएडीए’कडे या प्रकरणाबाबत विचारणा करण्याची मागणी केली आहे.
 
 
बँकेने आणि एजन्सीने केलेल्या चौकशीत ‘युआयएडीए’ने विक्रमवर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे समोर आले असून ‘युआयएडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, ते या प्रकरणातील कोणतीही माहिती देऊ शकत नाही तसेच चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.