वरूडमध्ये 8 फेब्रुवारीपासून राष्ट्रीय कृषी विकास परिषद - मकरंद अनासपुरे, भारत गणेशपुरे राहणार उपस्थित - डॉ. अनिल बोंडेंनी केले भूमिपूजन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
वरूड,
येथे 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास परिषद होणार आहे. या कृषी विकास परिषदेचा भूमिपूजन कार्यक्रम मंगळवारी आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते आंडेवाडी, कोर्ट रोडवरील खुल्या मैदानात झाला.
 

 
 
डॉ. बोंडे माहिती देताना म्हणाले की, वरूड येथे आयोजित कृषी विकास परिषदेच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे व ‘चला हवा येऊ द्या फेम’ भारत गणेशपुरे येणार आहे. तसेच या परिषदेत विविध विभागांची महत्त्वपूर्ण योजनांची माहिती देणारी दालने असतील. परिषदेतून शेतकरी बांधवांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी देशभरातील नामवंत कृषी मार्गदर्शकांना निमंत्रित करण्यात येईल. आवश्यक तिथे प्रात्यक्षिकांतून मार्गदर्शन करण्यात येईल. नामवंत कंपन्या, प्रयोगशील शेतकरी, शास्त्रज्ञ आदींचा सहभाग परिषदेत असेल. संत्रा पीक जिल्ह्यातील महत्त्वाचे फळपीक आहे. हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने नवीन संशोधन व प्रयोगांची माहिती देणारी दालने, विविध बँकांकडून शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध उपक्रम व सुविधांबाबत कक्षाचा समावेश, महिला बचतगटांना मार्गदर्शन, अल्पसंख्यक बांधवांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती होण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून रामपाल महाराज यांचे कीर्तन, लोककला दंडार, सांस्कृतिक नृत्य व ऑर्केस्ट्रा, अशा रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले असून या कृषी विकास परिषदेला मोठ्या संख्येने, शेतकरी बांधवांनी, तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.