पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला झाली न्यायधीश
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
 
 
 

 
 
मुस्लिम बहुल पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एक हिंदू महिला न्यायाधीश झाली आहे. सुमन कुमारी यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुमन या कम्बर-शाहददकोट इथल्या रहिवासी आहेत.
हैदराबाद आणि कराची विद्यापीठातून सुमन कुमारी यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे. सुमन यांचे वडील पवन कुमार बोदन हे डॉक्टर असून  सुमन यांची एक बहिण इंजिनिअर तर दुसरी सीए आहे. सुमन यांनी कम्बर-शाहददकोट इथल्या गरीबांना अडचणींच्या काळात कायद्याचं मार्गदर्शन करावं, त्यांना मदत करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा आहे. ‘सुमन यांनी वेगळं पण कठीण क्षेत्र निवडलं आहे. पण मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर ती नक्की पुढे जाईल’, असा विश्वास तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.
सुमन या लता मंगेशकर यांच्या खूप मोठ्या फॅन आहेत. पाकिस्तानमधल्या त्या पहिल्या हिंदू महिला न्यायाधीश झाल्यानंतर जगभरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानमध्ये केवळ २ % हिंदू आहेत. यापूर्वी राना भगवान दास हे पाकिस्तानमधील हिंदू समाजातील पहिले न्यायाधीश ठरले होते. त्यांनी २००५ ते २००७ या काळात मुख्य न्यायाधीश म्हणून कामगिरी बजावली होती.