शंकरपटात ‘दाणी’ वर धावणार बैलांऐवजी ट्रॅक्टर्स!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
-प्रा.विश्वपाल हजारे
 
लाखांदूर: 
शेती बदलते आहे. गावगाड्याची जीवनशैलीही बदलते आहे. शेतीचे यांत्रिकीकरण होते आहे अन्‌ त्याचा परिणाम कृषीच्या सण आणि उत्सवांवरही होतो आहे. रब्बीच्या सुगीच्या दिवसांत शंकरपटांना उधाण यायचे, आता त्याला भुतदयेच्या नावावर आडकाठी घालण्यात आली. कायदा करण्यांत आला. तरीही मग परंपरा तर कायम असलीच पाहिजे... मस्तवाल पहेलवान बैलांच्या शर्यती नाही लावता येत तर मग शेतीत त्यांच्याएवजी ट्रॅक्टर वापरले जातात, त्यांच्याच शर्यती लावण्याची शक्कल लढविण्यात आली आहे. हे म्हणजे कसे एकदम कार्पोरेट झाले... याला आता ट्रॅक्टर कंपन्या प्रायोजकत्वही देतील!
मासळ गावातील अडीचशे वर्षाची शंकरपटाची परंपरा यावेळी कायम राहिल, फरक ऐवढाच पटाच्या दाणीवर बैलजोड्यांऐवजी धावतील, ते ट्रॅक्टर्स!
 
 
 
दिवसागणिक बरेच काही बदलत चालले आहे. बदलत्या परिस्थितीनूसार बदल घडवून आणावा असे म्हणतात. मात्र ज्या जून्या रुढी परंपरा आहेत, त्याच्याशी तडजोड करणे बरेचदा अवघड होते. त्यातच ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळाचा शंकर पटाचा विषय असेल तर कठीणच आहे. वर्षानूवर्षापासून जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये शंकर पटाची परंपरा आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून या शंकरपटांवर बंदी आली.
 
प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यामुळे अनेक ठिकाणचे शंकरपट बंद झाले. मात्र लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे हा शंकरपट भरविला जात होता. यावेळीही तो भरविण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडे पट समितीच्या वतीने अर्ज सादर केला गेला. परंतु, जिल्हा प्रशासनाने न्यायप्रविष्ठ प्रकरणाचा दाखला देत परवानगी नाकारली. मग, शंकरपट होणारच मात्र तो बैलाऐवजी ट्रॅक्टरचा, असा विचार पुढे येऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले. २ आणि ३ फेब्रुवारी रोजी हा ट्रॅक्टरचा अनोखा शंकरपट मासळ येथे रंगणार आहे. फरक एवढाच या शंकरपटात बैल व शेकड्याच्या ऐवजी ट्रॅक्टर असेल आणि सरळ दिशेने पळण्याऐवजी हे ट्रॅक्टर ‘रिव्हर्स’ म्हणजेच मागे येताना दिसणार आहे. परंपरा जपण्यासाठी मासळ येथील शंकरपट समितीने पुढे आणलेली ट्रॅक्टरच्या शंकरपटाची कल्पना नक्कीच भन्नाट आहे. आता ती बैलाच्या शंकरपटाच्या तुलनेत ग्रामस्थांना किती प्रभावित करून जाते, यावर आयोजनाची फलश्रृती राहणार आहे.