टाटा स्टील दक्षिण पूर्व आशियातील व्यवसाय चीनी कंपनीला विकणार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
बीजिंग,
टाटा स्टीलने आपला दक्षिण पूर्व आशियातील व्यवसाय चीनच्या एचबीआयएस समूहाला विकण्याची घोषणा केली आहे. टाटा स्टील आणि एचबीआयएस मधील हा व्यवहार 32.7 कोटी डॉलर्सला होणार आहे. हा व्यवहार झाल्यानंतर टाटा स्टीलच्या दक्षिण पूर्व आशियातील व्यवसायातील 70 टक्के हिस्सा चीनी समूह एचबीआयएसच्या मालकीचा असेल तर उर्वरित 30 टक्के हिस्सा टाटा स्टीलची होल्डिंग कंपनी, टाटा स्टील ग्लोबल होल्डींगच्या मालकीचा असणार आहे. बीजींगमध्ये या संदर्भातील करारावर सह्या झाल्या आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत हा व्यवहार पूर्ण होणार असल्याची माहिती, टाटा स्टीलच्या व्यवस्थापनाने दिली आहे.


 
 
चीनच्या सरकारी मालकीचा एचबीआयएस समूह जगातील सर्वाधिक पोलाद उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. चीनमधील घरगुती उपयोगाच्या वस्तू आणि ऑटोमोटीव्ह स्टील उद्योग त्याचबरोबर अणूऊर्जा प्रकल्पांना आवश्यक असलेले पोलाद, मरिन इंजिनियरींग, पूल आणि बांधकाम व्यवसायासाठी आवश्यक पोलादाचे उत्पादन करण्यात एचबीआयएस समूह आघाडीवर आहे.
 
एचबीआयएस समूहाचा महसूल तब्बल 40 अब्ज डॉलर्स इतका आहे. तर समूहाची एकूण मालमत्ता 50 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. या व्यवहारात टाटा स्टीलला मालमत्तेपेक्षा दीडपट किंमत मिळाल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे. यामुळे टाटा स्टील समूहाचे कर्ज बऱ्याच अंशी कमी करण्यात यश येणार आहे. ज्या भागातील व्यवसायात मर्यादित नफा आहे तो व्यवसाय विकून आंतरराष्ट्रीय बाजारातील महत्त्वाच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे टाटा स्टीलचे धोरण आहे.