मेंडकी-एकारा रस्त्यावर बछड्यासह वाघीण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
ब्रह्मपुरी :
 
ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी-एकारा रस्त्यावर पट्टेदार वाघीण आपल्या बछड्यासह अनेकांना दिसत आहे. मेंडकीवरून वनविभागाचे विश्रामगृह असलेल्या जंगलव्याप्त एकारा येथे जाताना नवेगावच्या पुढे व रामपुरीच्या तलाव परिसरात अनेकांनी या वाघिणीला बघितल्याचे वृत्त आहे.
 
 
 
ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या माजी सभापती वंदना शेंडे यांनी सुद्धा आज मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मेंडकी-एकारा रस्त्यावर हे व्याघ्र कुटुंंब बघितले. यासंदर्भात वन्यजीव रक्षक विवेक करंबळेकर यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी बरेचदा वाघीण तिच्या बछड्यासह आढळते, असे सांगत याची पुष्टी केली.
 
मेंडकी-एकारा जंगल परिसरातच या वाघिणीने मागील वर्षी या पिलांना जन्म दिला असून, आता वर्षभराचे झालेल्या या बछड्यात 3 नर व एक मादी असल्याचे बोलले जात आहे. एकारा परिसर जंगलव्याप्त असून, येथे एकारा तलाव परिसरात वनविभागाचे विश्रामगृह आहे.