ट्रायच्या कक्षेत आता व्हॉट्सअॅप, स्काइप
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :29-Jan-2019
नवी दिल्ली,
टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने व्हॉट्सअॅप, स्काइप, फेसबुक आणि गुगल ड्यू आपल्या कक्षेत आणण्याच्या प्रयत्न सुरु केले आहे. आता या सर्वांकडून कॉलिंगची सुविधा मिळत असल्याने ट्रायचे नियम पाळणे बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे. ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी देखील याबाबत सांगितले की, व्हॉट्सअॅप, स्काइप, फेसबुक आणि गुगल ड्यू देखील कॉलिंगची सुविधा देत असल्याने त्यांना देखील ट्रायच्या कक्षेत आणले जाऊ शकते.
 

 
सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केलेल्या मागणीनुसार, कॉलिंगची सुविधा देणाऱ्या सर्व माध्यमांच्या बाबतीत एकच नियम नसल्याने या कक्षेबाहेर असणाऱ्या सेवांना ट्रायच्या कक्षेत आणावे. टेलिकॉम कंपन्या व अन्य सेवांमध्ये तांत्रिक फरक आहे टेलिकॉम सेवा पुरवण्यासाठी कंपन्यांना भरमसाट परवाना शुल्क, स्पेक्ट्रम, महागडी टेलिकॉम उपकरणे, सुरक्षात्मक उपाययोजना यावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. मात्र व्हॉट्सअॅप, स्काइप, गुगल ड्यू, फेसबुक यांसारख्या सेवांना कोणत्याही नियामक शुल्काशिवाय व्हॉइस/व्हिडीओ कॉलिंग, डेटासेवा आदी सुविधा पुरवता येतात. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केलेल्या लेखी तक्रारीची ट्रायने आता गंभीर दखल घेतली आहे. मात्र इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि ब्रॉडबॅण्ड इंडिया फोरमने याला विरोध दर्शविला आहे.