एनडीएफबी प्रमुखासह 9 जणांना जन्मठेप - आसाममधील बॉम्बस्फोट मालिका प्रकरण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
गुवाहाती,
आसाममध्ये 2008 मध्ये घडवलेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या आरोपात आज बुधवारी येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्डचा प्रमुख रंजन दायमारीसह 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या बॉम्बस्फोटांमध्ये 88 जण मृत्युमुखी पडले होते.

 
कडेकोट बंदोबस्तामध्ये झालेल्या सुनावणीत सीबीआयचे विशेष न्यायाधीश अपारेश चक्रवर्ती यांनी रंजन दायमारी, जॉर्ज बोडो, बी. थराय, राजू सरकार, आंची बोडो, इंद्रा ब्रह्मा, लोको बासुमत्राय, खरगेश्वर बासुमत्राय, अजय बासुमत्राय आणि राजन गोयारी यांना शिक्षा ठोठावली.
 
 
 
या प्रकरणातील इतर तीन दोषी प्रभात बोडो, जयंती बासुमत्राय आणि मथुरा ब्रह्मा यांची न्यायालयाने आकारलेला दंड भरल्यावर सुटका करण्यात आली. ठोठावलेल्या शिक्षेइतका अवधी तुरुंगात घालवल्याने निलिम दायमारी आणि मृदुल गोयारी यांची सुटका करण्याचे आदेश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले.
 
 
 
भादंविच्या विविध कलमांखाली सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवारी रंजन दायमारीसह 14 जणांना दोषी ठरवले होते. न्यायालयाने दोषी ठरवताच रंजन दायमारीचा जामीन रद्द करून त्याला ताब्यात घेण्यात आले. इतर 14 जण अगोदरच न्यायालयीन कोठडीत होते.