२१ फेब्रुवारीपासून सुरू होणार राम मंदिराचे निर्माण कार्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
 - शंकराचार्य स्वरुपानंदांच्या धर्मसंसदेतील निर्णय
 
प्रयागराज :
जगत्‌गुरू शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी कुंभमेळ्याचे निमित्त साधून प्रयागराज येथे बोलाविलेल्या धर्मसंसदेत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार येत्या 21 फेब्रुवारीपासून राम मंदिराचे निर्माण कार्य सुरू केले जाणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी राम मंदिरासाठी आधारशिला ठेवण्याचा प्रस्ताव आजच्या या धर्मसंसदेत पारित करण्यात आला. त्यासाठी साधू-संत अयोध्येकडे कूच करतील, असेही यावेळी ठरले.
 

 
 
परम धर्मसंसद गेल्या तीन दिवसांपासून प्रयागराज येथे सुरू आहे. बुधवारी या धर्मसंसदेत राम मंदिराच्या निर्माण कार्यावर चर्चा करण्यात आली आणि चर्चेनंतर प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावानुसार मंदिराच्या निर्माण कार्याची जबाबदारी साधू-संतांवर राहील.
 
वादग्रस्त विधान करताना शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती म्हणाले की, अयोध्या येथे मशीद नव्हे तर मंदिर तोडण्यात आले. तसेच, मोदी सरकारवर आरोप करताना ते म्हणाले की, जन्मभूमी सोडून दुसरीकडेच मंदिर उभे करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. नरिंसहराव यांनी म्हटले होते की, ज्यांच्याकडून जमीन घेतली जाईल ती त्यांना परत केली जाणार नाही. आम्ही अयोध्या येथे जाऊन जन्मभूमी येथे मंदिराचा शिलान्यास करू.
 
या प्रस्तावाचे वाचन स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केले. त्यानुसार, राम मंदिरासाठी शांततापूर्ण मार्गाने व अहिंसक पद्धतीने आंदोलन केले जाईल. अयोध्येत 21 फेब्रुवारीला शिलान्यास करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी रोखण्यात आले तर साधू-संत गोळ्या झेलण्यासाठीही तयार राहतील. राम मंदिरासाठी जमीन हस्तांतरित करण्यात आली नाही तर आंदोलन करून कारागृहात जाण्याची तयारीही करण्यात येईल. नंदा, भद्रा, जया आणि पूर्णा नावांनी शिलांचा अयोध्येत शिलान्यास होईल.