भारत-न्यूझीलंड उद्या भिडणार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
- रोहित शर्माचा २००वा एकदिवसीय सामना
 
हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना उद्या सकाळी सेडॉन पार्क, हॅमिल्टन येथे खेळला जाणार आहे. त्याचे द्विशतक झळकावणे सर्वश्रुत आहे, तो भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्मा गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात जबरदस्त प्रदर्शनासह आपला २०० वा सामना भारतासाठी संस्मरणीय करू इच्छिणार आहे.
 
भारताने आधीच पाच सामन्यांची ही वन-डे मालिका ३-० ने खिशात घातली आहे. कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. हंगामी कर्णधार म्हणून रोहित शर्माची कामगिरी उत्तम राहिली आहे व त्याच्या नावे वन-डेतील तीन द्विशतके आहेत. तेव्हा सेडॉन पार्कवरील फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर अशीच द्विशतकी खेळी करण्याचा त्याचा मानस राहील.
 

 
 
जर भारताने हा सामना जिंकला, तर ५२ वर्षात न्यूझीलंड दौर्‍यातील ४-० अशी आघाडी मिळवून भारताचा सर्वात मोठा मालिका विजय ठरेल.
उर्वरित दोन सामने हे भारतासाठी पुन्हा एकदा बाकावर बसलेल्या युवा खेळाडूंची चाचणी घेण्यासाठी व त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव देण्यासाठी आदर्श स्थान ठरेल. कोहलीच्या जागी युवा खेळाडू शुभमन गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसर्‍या क्रमांकाच्या जागेसाठी शुभमनची दावेदारी निश्चित मानली जात आहे. कोहलीनेही १९ वर्षीय शुभमनची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
 
स्थळ : सेडॉन पार्क, हॅमिल्टन
- सामन्याची वेळ : सकाळी 7.30 वाजतापासून
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्‌ 1, 3 व डीडी स्पोर्टस्‌वर