महाआघाडीचे सरकार आल्यास रोज पंतप्रधान बदलणार : शाह
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
कानपूर :
विरोधी पक्षांनी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी करीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की, देशातील महत्त्वपूर्ण ठरणार लोकसभा निवडणुकीत भाजपाला इतक्या जागा जिंकवून द्या की विरोधकांचे धाबे दणाणले पाहिजे.
 

 
शाह यांनी भाजपाच्या बूथ अध्यक्षांच्या परिषदेला संबोधित करताना उत्तर प्रदेशात झालेल्या सपा-बसपा आघाडी आणि राष्ट्रीय स्तरावर एकत्रित आलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केले. तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे, हे जाहीर करा. जर महाआघाडी झाली तर सोमवारी मायावती, मंगळवारी अखिलेश यादव, बुधवारी ममता, गुरुवारी शरद पवार, शुक्रवारी देवेगौडा, शनिवारी स्टॅलिन पंतप्रधान होतील. रविवारी तर देश सुटीवर जाईल. हे लोक परिवर्तन करायला निघाले आहे आणि यांच्या नेत्याचा पत्ताच नाही.
 
 
 
भाजपाचे फोर बी आहेत ‘बढता भारत, बनता भारत’. जे महाआघाडी करायला निघाले आहे त्यांचेही फोर बी आहेत. ते म्हणजे बुआ, भतीजा, भाई और बहन. या लोकांचे सरकार देशाला पुढे नेणार नाही. आमची इच्छा आहे की मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा देशात मजबूत सरकार स्थापन व्हावी. विरोधी पक्षांची इच्छा आहे की सरकार मजबूर असावे, असे सांगून अमित शाह म्हणाले की, मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, लोकसभा निवडणूक ही लढाई आहे आणि ती देशासाठी महत्त्वपूर्ण आहे. ही लढाई जिंकणे भाजपासोबतच भारतासाठी आवश्यक आहे.
 
 
 
एनआरसीच्या मुद्याबाबत बोलताना शाह म्हणाले की, निवडणुकीचा सामना करण्याआधी महाआघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. भाजपा पुन्हा सत्तेवर आल्यास काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत एकेका घुसखोराला शोधून शोधून बाहेर काढले जाईल.
 
मी येथे उत्तर प्रदेशच्या जनतेला आश्वस्त करण्यासाठी आलो आहे की, राम जन्मभूमीवर भव्य मंदिर लवकरच तयार होईल आणि त्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे, असेही अमित शाह म्हणाले. राम जन्मभूमी न्यासची ४२ एकर जमीन कॉंग्रेस सरकारने अधिग्रहित केली होती. न्यासने ती जमीन परत मागितली आहे, त्यामुळे आम्ही त्याबाबत निर्णय घेतला आहे. हे धाडसी पाऊल उचलण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत, असे शाह म्हणाले.