लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीसाठी हजारेंचे आज पासून उपोषण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019

 
 
 

    
 
 
 
पारनेर :
 
 लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे बुधवारपासून राळेगणसिद्धीतील संत यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषणास बसणार आहेत. दरम्यान, राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्याच्या निर्णयाचे हजारे यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असला तरी विधानसभेच्या मंजुरीशिवाय त्याचे कायद्यात रूपांतर होणार नसल्याने आपण आंदोलनावर ठाम असल्याचे हजारे यांनी सांगितले.

गेल्या वर्षी याच मागण्यांसाठी हजारे यांनी दिल्लीमध्ये उपोषण केले होते, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करीत आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले होते. पुढील सहा महिन्यात हजारे यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे लेखी आश्वासन पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले होते. सहा महिन्याचा कालावधी उलटूनही हजारे यांच्या मागण्यांवर काहीही निर्णय झाला नाही त्यामुळे पूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे २ ऑक्टोबरपासून राळेगसिद्धीत आंदोलन करण्याची हजारे यांनी तयारी केली.

 
हजारे यांच्या मागण्यांवर ९० टक्के निर्णय झाले असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल असे त्यावेळी महाजन यांनी सांगितले होते. दरम्यानच्या काळात हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा पत्र पाठवून मागण्यांबाबत स्मरण करून दिले होते, परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही. सरकारकडून चालढकल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर हजारे यांनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश बापट यांनी पुन्हा हजारे यांची दोनदा भेट घेऊ न मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फोल ठरला. दरम्यान, हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी बुधवारी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.