यावेळचा अर्थसंकल्प अंतरिम - आजपासून संसदेचे अधिवेशन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
नवी दिल्ली,
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी होणारे हे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे या अधिवेशनात सरकार काय करते, याकडे लक्ष राहणार आहे.
 
 

 
 
 
 
 
राष्ट्रपती रामनाथ कोिंवद यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. अर्थखात्याचा अतिरिक्त कार्यभार मिळालेले रेल्वेमंत्री पीयूष गोयल 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. लोकसभा निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प अंतरिम नसून पूर्ण राहणार असल्याची तसेच यातून केंद्र सरकार अनेक लोकप्रिय घोषणा करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अर्थमंत्रालयाने आज अधिकृत खुलासा करत हा अर्थसंकल्प पूर्ण नाही तर अंतरिम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
मोदी सरकारचा या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. आतापर्यंतचे सर्व अर्थसंकल्प अर्थमंत्री असलेल्या अरुण जेटली यांनी सादर केले होते. यावेळी उपचारासाठी अमेरिकेत जावे लागल्यामुळे जेटली हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करु शकत नाही. अंतरिम अर्थसंकल्पातूनही पीयूष गोयल शेतकरी तसेच मध्यमवर्गासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
यावेळचा अर्थसंकल्प अंतरिम राहणार नसून त्यापेक्षा काहीतरी त्यात जास्त राहणार आहे, असे अरुण जेटली यांनीच म्हटले होते. त्यामुळे सरकार यावेळी पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र निवडणुकीच्या वर्षात लेखानुदान सादर न करता पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे संसदीय प्रथा आणि परंपरांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.
 
 
राज्यसभेत प्रलंबित असलेली तीन तलाकसह अन्य अनेक महत्त्वपूर्ण विधेयके अर्थसंकल्पीय अधिवेशनात पारित करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. दुसरीकडे राफेल मुद्यावरून सरकारला घेरण्याची कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांची भूमिका राहणार असल्याचे समजते.