मुद्रा बँक कर्जामुळे व्यवसायाला उभारी - आठवी उत्तीर्ण युवकाने थाटले हार्डवेअरचे दुकान
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
यवतमाळ,
व्यवसाय म्हटला की भांडवल असणे गरजेचेे आहे. कुणाजवळ ते असते तर कुणाजवळ नाही. मात्र स्वत:च्या कार्यशक्तीवर विश्वास असेल तर भांडवल उभे करण्याचे मार्ग सापडतात. हाच आत्मविश्वास पुसद तालुक्यातील पाळोदी येथील रवी रामराव राऊत (वय 28) या तरुणाने बाळगला. स्वत:च्या इच्छाशक्तीवर रवीने हार्डवेअरचे दुकान थाटले. भांडवल उभारण्यासाठी त्याला मुद्रा बँकेच्या कर्जाची साथ मिळाली. या कर्जामुळेच रवीच्या व्यवसायाला उभारी मिळाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतेच या दुकानाचे उद्घाटन केले.
 
 
 
रवीला या हार्डवेअर व्यवसायाचा तब्बल 16 वर्षांचा अनुभव आहे. स्वत:च्या मालकीचे दुकान असावे, असे त्याला वाटत होते. भांडवलाशिवाय व्यवसाय उभारणे शक्य नाही, याची त्याला कल्पना होती. त्याने प्रथम यु-ट्यूबवर मुद्रा बँकेच्या कर्जाविषयी ऐकले. तेव्हाच त्याने ठरविले की ‘मुद्रा’ कर्जातून आपण व्यवसाय उभा करू शकतो.
पुसदच्या स्टेट बँक शाखेत त्याचे खाते होते. त्याने मुद्रा बँक योजनेचे बॅनर पाहिले व त्या बँकेच्या कर्जाबाबत त्याने विचारणा केली. स्वत:च्या व्यवसायाची फाईल तयार करून बँकेत सादर केली. विशेष म्हणजे यासाठी त्याने सतत पाठपुरावा केला. मागेल ती कागदपत्रे बँकेला सादर केली.
 
 
 
तरीसुद्धा कर्ज देण्यास विलंब होत होता. अखेर त्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेतली व त्यांनी लगेच या होतकरू तरुणाला मदत करण्यास बँकेला सांगितले. काही दिवसांत रवीला मुद्रा योजनेच्या माध्यमातून 4 लाखांचे कर्ज मिळाले. या कर्जामुळे त्याची स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात उतरली आणि पुसद येथे ‘देवदत्त हार्डवेअर’ असे दुकान त्याने थाटले.
आठवी उत्तीर्ण असलेला रवी राऊत 20 रुपये मिळकतीपासून काम करीत होता. हार्डवेअरच्या व्यवसायाचा अनुभव घेऊन त्याने िंहमत केली. आज त्याच्या दुकानातून रोज 4 ते 5 हजार रुपयांच्या साहित्याची विक्री होत आहे. म्हणजे महिन्याकाठी सव्वा ते दीड लाख रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत आहे.
 
 
 
सद्यस्थितीत रवीच्या दुकानात क्रेडिटवर आठ लाख रुपयांचा माल आहे. हा सर्व माल रवी पुसद एमआयडीसी तसेच अमरावती, नागपूर आणि नांदेडच्या व्यापार्‍यांकडून घेतो.
 
 
 
शासनाच्या सहकार्यातून तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी रवी नेहमी मार्गदर्शन करतो. पाळोदी हे गाव मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट आहे. गावाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षण, आरोग्य, कृषी, उपजीविका यासोबतच रोजगार निर्मिती व स्वयंरोजगारसाठी गावात विशेष प्रयत्न केले जात आहेत.