भारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास मोदींची मदत करू- चीन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली:
 
भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करू शकतो, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे. मोदींनी भारताला नियंत्रणात ठेवावं, अशी चीनची इच्छा आहे. भारतात कमी प्रमाणात रोजगार उपलब्ध असल्यानं मोदींना जनतेच्या असंतोषाचा सामना करावा लागत आहे. चीनसाठी ही चांगली बातमी नाही, असंही ग्लोबल टाइम्समधून छापण्यात आलं आहे.
रिपोर्टनुसार, डोकलाममध्ये दोन्ही देशांच्या सेना एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर जवळपास वर्षभरानं दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारत आहेत. भारत आणि चीनदरम्यान आर्थिक द्विपक्षीय संबंधही मजबूत असून, ते वेगानं पुढे जात आहेत. तसेच मोदींनी चीनकडून येणारी गुंतवणूक वाढवल्यास भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे मोदींच्या प्रतिमेतही सुधारणा होऊ शकते. भारत हा देश धर्मसंकटात अडकला आहे. दिल्लीनं चीनमधून येणारी गुंतवणूक थांबवल्यास अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत.
भारतात चीनची गुंतवणूक ही मुख्यत्वे कामगारांशी जोडलेल्या क्षेत्रात आहे. जसे की स्मार्टफोन प्लांट वगैरे वगैरे. जर भारतानं चिनी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्यास मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारनं रोजगार उपलब्ध करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. अशातच चीनकडून येणारी गुंतवणूक वाढवल्यास बऱ्याच नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात, असंही ग्लोबल टाइम्समध्ये म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधीही म्हणाले होते की, चीन उत्पादन क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यामुळे त्यांच्या नोकऱ्यांची कमी नाही. भारतानंही उत्पादन क्षेत्राला चालना दिली पाहिजे, जेणेकरून भारतात नोकऱ्या उपलब्ध होतील. रोजगाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनीही मोदींवर टीका केली होती.