'मामि'च्या अध्यक्षपदी दिपिका पदुकोण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
 
 
 


 
 
 
मुंबई शहराची सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी अभिनेत्री दिपीका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी अभिनेता आमिर खान यांची पत्नी किरण राव ही ‘मामि’ची अध्यक्ष होती. त्यानंतर आता दिपीका या पदाची जबाबदारी पार पाडणार आहे. निवड झाल्यानंतर दिपीकाने साऱ्यांचे आभार मानले.
किरण राव सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यामुळे तिला अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. किरणच्या राजीनाम्यामुळे काही दिवसांपूर्वी मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या सदस्य मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांसाठी वोटिंग करण्यात आलं. यामध्ये दिपीका सर्वाधिक मत मिळवून विजयी झाली . दिपीकाची या पदी निवड झाल्यानंतर किरणने तिला शुभेच्छाही दिल्याचं पाहायला मिळालं.
‘मामि’च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिपीका नक्कीच या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडेल. तिच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत’, असं किरण म्हणाली.
दरम्यान, दिपीका सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. गेल्या वर्षभरापासून तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहेत. ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दिपीकाचा प्रत्येक चित्रपट हिट ठरत असून संजय लिला भन्साळींच्या ‘पद्मावत’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. दिपीका लवकरच अॅसिड हल्लापिडीत लक्ष्मी अगरवाल हिच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.