राफेलवरील चर्चेचा राहुल गांधींचा दावा खोटा - मनोहर पर्रीकरांनी पत्र पाठवून काढली खरडपट्टी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर
राफेल कराराबाबत तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना काहीच माहिती नव्हती, असा खोटारडा दावा करीत केंद्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. राहुल गांधी यांच्या भेटीदरम्यान राफेलबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करीत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राहुल गांधींना पत्र पाठवून खरडपट्टी काढली. सदिच्छा भेट घेतल्याचे सुरुवातीला जाहीर करून नंतर त्या भेटीचे राजकारण करण्याचा राहुल गांधींचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे.
 
 

 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराची माहिती तत्कालीन संरक्षणमंत्र्यांनाही दिली नाही. मनोहर पर्रीकरांच्या भेटीदरम्यान, त्यांनी स्वतः मला याबाबत सांगितले, असा पोरकट दावा राहुल गांधी यांनी केला आहे. यावर मनोहर पर्रीकर यांनी राहुल गांधींना खरमरीत पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांची ‘सदिच्छा’ भेट अवघ्या 5 मिनिटांची झाली. या भेटीदरम्यान राफेलचा विषयही निघाला नाही आणि त्यावर कोणती चर्चाही झाली नाही, असे पर्रीकरांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
 
 
 
कोणतीही पूर्वसूचना न देता राहुल गांधी यांनी भेटीसाठी वेळ मागितली. राजकीय मतभेद विसरून आपण भेटायला आलात, याबद्दल मला समाधान वाटले. मात्र, राफेलबाबत आपल्यात चर्चा झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून समजले. सदिच्छा भेटीच्या नावाखाली राजकीय वातावरण दूषित करणे, हा आपला हेतू होता आणि यामुळे मला वेदना झाल्यात. घरी येण्यामागील आपला उद्देश स्वच्छ नव्हता, असेच आता म्हणावे लागेल, अशा शब्दांत मनोहर पर्रीकर यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.
 
 
 
 
सध्या माझा जीवनाशी संघर्ष सुरू असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. आपली भेट सकारात्मकता देईल, असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. अत्यंत खेदाने आपणास सांगावे लागत आहे की, आतातरी सत्य स्वीकारा, असे सांगत, यापुढे आजारी माणसाची भेट घेऊन त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन पर्रीकर यांनी पत्रात केले आहे.
 
 
 
दरम्यान, पणजी येथे जाऊन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सदिच्छा भेट घेतली. आजारी असलेले पर्रिकर नुकतेच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. पर्रिकर भेटीचे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.