कार्ती चिदम्बरम्ला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले! - विदेशात जायचे असल्यास 10 कोटी जमा करा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
नवी दिल्ली,
एअरसेल-मॅक्सिस व आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील आरोपी व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम्‌ यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम्ला सर्वोच्च न्यायालयाने विदेशी जाण्यासाठी परवानगी दिली असली, तरी सुरक्षा अनामत म्हणून 10 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी त्याला फटकारत कायद्यासोबत खेळू नका. चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाला सहकार्य करा, असे सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे.
 

 
5, 6, 7 आणि 12 मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहावे, असे न्यायालयाने त्याला खडसावले आहे. तुम्हाला कुठे जायचे असेल ते 10 ते 26 फेब्रुवारी दरम्यान जा; पण तपास यंत्रणेला चौकशीत पूर्ण सहकार्य करा, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई प्रमुख असलेल्या न्यायासनाने त्याला फटकारले. तुमचा अशील तपासयंत्रणेला चौकशीत सहकार्य करीत नाही. त्याला सहकार्य करायला सांगा. आम्हाला बरेच काही सांगायचे आहे. मात्र, सध्या आम्ही काही बोलणार नाही, असेही न्यायासनाने यावेळी म्हटले.
 
 
 
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने कार्ती चिदम्बरम्‌च्या चौकशीसाठी तारीख निश्चित करण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाला सोमवारी दिले होते.
 
 
 
आज बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या सेक्रेटरी जनरलकडे 10 कोटी रुपये सुरक्षा अनामत जमा करण्याचे, तसेच तपासयंत्रणेला चौकशीत सहकार्य करण्याचे हमिपत्र देण्याचे आदेशही न्यायासनाने दिले आहेत.