सच्चा कामगारनेता हरपला!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
जॉर्ज फर्नांडिस नावाचा झंझावात, मंगळवारी नेहमीसाठी शांत झाला. कामगारांच्या हितासाठी अखेरपर्यंत लढणारा सच्चा संघटक काळाच्या पडद्याआड गेल्याने, कामगार चळवळीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. गेली पाच दशके हा झंझावात सारखा घोंघावत होता. जॉर्ज फर्नांडिस यांचा कामगार चळवळीत एवढा जबरदस्त दबदबा होता की, कॉंग‘ेस पक्षातील सर्वच नेते त्यांना चळाचळा कापत. त्यांचे संघटनकौशल्यच तसे होते. नेत्याचा कामगारांप्रती आणि कामगारांचा नेत्यांप्रती विश्वास एवढा जबरदस्त होता की, जॉर्ज यांनी मुंबई बंदची हाक दिली की, सार्‍या मुंबईत शुकशुकाट व्हायचा! त्या काळी मुंबईत कॉंग‘ेसचा प्रचंड दबदबा होता. 1967 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी, कॉंग्रेसचे दिग्गज नेते स. का. पाटील यांचा दणदणीत पराभव केला होता. एका कामगार नेत्याची ताकद किती असू शकते, याचे प्रत्यक्ष दर्शन या निवडणुकीने सार्‍या देशाला घडले.
 
मंगलोरमध्ये जन्म झालेल्या या नेत्याने 1949 साली मुंबईत पाय ठेवला आणि ते मुंबईचे होऊन गेले. त्यांनी मुंबईतील सर्व लहानमोठ्या कामगार, टॅक्सीचालकांच्या संघटना बांधल्या. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा रेल्वे कर्मचार्‍यांकडे वळविला. रेल्वे कर्मचार्‍यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी जबरदस्त आंदोलन उभे केले. या आंदोलनाकडे देशभरातील रेल्वे कर्मचार्‍यांचे लक्ष वेधले गेले. 1960 साली त्यांनी रेल्वे कर्मचार्‍यांचा संप घडवून आणला. ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनची स्थापना केली आणि 1974 साली पहिल्यांदा जॉर्ज यांनी रेल्वेचा देशव्यापी संप घडवून आणला. देशभरातील रेल्वे जागच्या जागी थांबल्याचे हे जगातील बहुधा एकमेव उदाहरण असावे! हा संप तब्बल 20 दिवस चालला. 17 लाख कर्मचारी या संपात सामील झाले. जॉर्ज भूमिगत झाले होते. ते कोलकात्यात असताना, विरोधी संघटनांच्या लोकांनी पोलिसांना सूचना दिली. जॉर्ज, संप सुरू होण्याच्या आधीच पकडले गेेले. पण, संप 20 दिवस कायम राहिला.
 
 
 
ब्रिटिशांच्या काळापासून सुरू असलेले कायदे आणि नियम बदलून सर्वांना आठ तास काम, वेतनवाढ, अन्य सवलती मिळाव्यात, यासाठी हा संप होता. प्रामु‘याने रेल्वे इंजीनचालकांचेही कामाचे तास आठच करावेत, अशा 12 मागण्या त्यात होत्या. संपामुळे इंदिरा गांधी प्रचंड धास्तावल्या. त्यांनी संप चिरडून टाकण्यासाठी देशभरात धरपकड सुरू केली. हजारो कर्मचार्‍यांना तुरुंगात डांबले. अनेकांना नोकरीतून काढून टाकले. 20 दिवसांनंतर संप मागे घेण्यात आला. त्या संपाने जागतिक इतिहास घडविला. लगेच दुसर्‍या वर्षी इंदिरा गांधी यांनी आणिबाणी घोषित केली. त्या वेळीही जॉर्ज भूमिगत झाले. आणिबाणी सुरू असताना, जॉर्ज यांनी रेल्वेपूल आणि अन्य संसाधने उडवून देण्यासाठी डायनामाईटचा वापर करण्याचा कट रचला होता, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आणि तपास सीबीआयकडे देण्यात आला. कारागृहात असताना, त्यांची भेट जनसंघाच्या अनेक नेत्यांसोबत झाली आणि येथूनच राजकारणाच्या नव्या प्रवाहाचा प्रारंभ झाला. जॉर्ज यांच्यावर बरोडा डायनामाईट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना 1976 साली अटक करण्यात आली.
 
1977 मध्ये आणिबाणी उठल्यानंतर जॉर्ज यांच्यावर खटला सुरूच होता. त्यांनी तुरुंगातून बिहारच्या मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आणि कारागृहात असतानाच, तीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले. मोरारजी देसाई सरकार आल्यावर जॉर्जवरील खटला मागे घेण्यात आला. मंत्रिमंडळात त्यांच्याकडे उद्योग खाते देण्यात आले. कोका कोला आणि आयबीएम या कंपन्यांनी फेरा कायद्यांचा भंग केल्यामुळे या दोन्ही कंपन्यांना जॉर्ज फर्नांडिस यांनी देश सोडून जाण्याचा आदेश दिला. त्यामुळे देशातच नव्हे, तर जगभरात खळबळ माजली. त्यांचा बाणा करारी होता. ते कोणताही निर्णय घेण्यात मागेपुढे पाहात नव्हते. अटलबिहारी वाजयेपी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री असताना, कारगिल युद्धाच्या वेळी त्यांनी खंबीर भूमिका घेत अटलजींच्या संमतीने वायुदलाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पोखरण येथील पाच अणुस्फोट चाचण्या याच काळात झाल्या. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस गरजले.
 
चीन हा भारताचा नंबर एकचा शत्रू असल्याचे विधान त्यांनी केले. चीन हा पाकिस्तानला शस्त्रे पुरवीत असून क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी संसाधने पुरवीत आहे व भारताविरुद्ध कट रचण्यास मदत करीत आहे, तिबेटमध्ये चीन सैन्याची जमवाजमव करून हिमालयन क्षेत्रात तणाव निर्माण करीत असल्याचेही विधान जॉर्ज यांनी केले होते. त्यामुळे कम्युनिस्ट वर्तुळात प्रचंड खळबळ माजली होती. विश्वनाथप्रताप सिंह मंत्रिमंडळात रेल्वे मंत्रालय त्यांच्याकडे एकच वर्षासाठी आले. पण, त्या वेळी त्यांनी कोकण रेल्वेचे महत्त्व जाणले आणि हे काम सुरू करण्याची योजना आखली. आयुष्यभर कामगारांच्या कल्याणासाठी झटणारे जॉर्ज फर्नांडिस यांनी शेवटपर्यंत खादीचा पुरस्कार केला. खादीचा पायजामा आणि खादीचाच गुरुशर्ट ही त्यांच्या राहणीमानाची ओळख होती. 50 च्या दशकातच डॉ. राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी विचारांनी ते प्रभावीत झाले होते. त्यांचा विचार होता की, लोहियांच्या मार्गानेच या देशातील तळागाळातील जनतेचे हित साधले जाऊ शकते. जनता दल विभाजित झाल्यानंतर त्यांनी समता पार्टी नावाचा पक्ष काढला. नितीशकुमार प्रभृती त्या पक्षात होते. पण, नंतरच्या काळात मतभेद झाल्याने त्यांना नाकारले गेले. तरीही ते डगमगले नाहीत. राष्ट्रीय राजकारणात त्यांची पकड मजबूत होती.
 
अटलजींच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी शेवटपर्यंत अटलजींना साथ दिली. अटलजींच्या 13 दिवसांच्या कार्यकाळात बहुमत मिळावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. पण, जयललितांनी धोका दिला आणि 13 दिवसांचे ते सरकार पडले. नंतर मात्र अटलजी पुन्हा पंतप्रधान झाले आणि 24 पक्ष मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन झाली. या सर्व पक्षांना एका व्यासपीठावर आणण्यात जॉर्ज फर्नांडिस यांनी मोलाची भूमिका बजावली. संरक्षणमंत्री असताना त्यांनी अतिशय उंचीवर असणार्‍या सियाचीन ग्लेशियर भागाला तब्बल 32 वेळा भेट दिली. पहिल्याच भेटीत, उणे 50 टक्के तापमानात इथले जवान कसे काम करीत असतील, या विचारांनी त्यांना अस्वस्थ केले. त्यानंतर त्यांनी घोषणा केली की, दर सहा महिन्यांनी मी सियाचीनला भेट देईन. जॉर्ज फर्नांडिस यांनी पाहिले की, आपल्या जवानांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पायी चालत जावे लागत असताना अतिशय त्रास होत आहे. त्यांनी लगेच निर्णय घेतला की, सियाचीनच्या जवानांना स्नो स्कूटर्स देण्यात येतील. पण, मंत्रालयातील अधिकारी फाईल दाबून बसले होते. त्यावर त्यांनी उपाय शोधला. दोन वरिष्ठ सचिवांनाच सियाचीनला सहलीसाठी पाठविले. फायली लगेच निघाल्या आणि मंजुरी मिळाली.
 
संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी, राजस्थानमध्ये जेव्हा तापमान 50 डिग्री सेल्सियस असते, त्या भीषण गर्मीत राजस्थानच्या लष्करी ठाण्यांना भेट द्यावी व त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहाव्यात, असे आदेश दिले. जार्ज यांच्या जीवनातील अनेक घटना सांगता येतील. त्यांच्या निधनाने सच्चा कामगार नेता, कुशल प्रशासक, खंबीर नेतृत्वाला देश मुकला आहे. त्यांना तरुण भारततर्फे आदरांजली!