राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा; महाराष्ट्राची शानदार घोडदौड
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
 
 
 
 

 
 
रोहा :
 
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या साखळीचा सोपा पेपर महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणेच प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केला. स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने गुजरातला ६०-२७ असे नमवून  सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे अ-गटातून विजेत्याच्या रूबाबात महाराष्ट्राने उपउपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली आहे. बुधवारपासून बाद फेरीच्या अग्निपरीक्षेला सुरुवात होत असून, महाराष्ट्राची गाठ केरळशी पडणार आहे.
 
दत्ताजीराव ग. तटकरे क्रीडानगरीत झालेल्या अ-गटातील साखळी लढतीत महाराष्ट्राने सुरुवातीपासून सामन्यावर नियंत्रण मिळवताना चौथ्या मिनिटालाच गुजरातवर लोण चढवला. मग नवव्या आणि १३व्या मिनिटाला आणखी दोन लोण चढवले. त्यामुळे मध्यंतराला ४२-९ अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या सत्रात गुजरातने अधिक ताकदीने प्रतिकार केल्यामुळे महाराष्ट्राने २२व्या मिनिटाला दिलेल्या लोणनंतर गुजरातनेसुद्धा एक लोण चढवण्यात यश मिळवले.
 
महाराष्ट्राच्या गुणसंख्येत तुषार पाटील (७ चढायांमध्ये १० गुण), अभिषेक भोजने (८ चढायांमध्ये १० गुण), रिशांक देवाडिगा (१० चढायांमध्ये ९ गुण) आणि अजिंक्य पवार (८ चढायांमध्ये ९ गुण) या चौघांच्या दमदार आक्रमणाने महत्त्वाची भूमिका बजावली. तुषार आणि अभिषेकने दोनदा अव्वल चढाया करीत प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय विकास काळे आणि विशाल माने यांनी प्रत्येकी दोन पकडी केल्या.