पालतेवारांचा अटकपूर्व जमीन फेटाळला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
चर्चित मेडिट्रीना हॉस्पिटल (रामदासपेठ) यांच्या संचालक डॉक्टर समीर नारायणराव पालतेवार यांच्यावर 420, 406, 465, 467, 468, 471, 120(B), 34 भा.द.वी. कलम नुसार त्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा (420) कोटी रुपयांचा गुन्हा सिताबर्डी पुलिस स्टेशनला दाखल आहे, सदर प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणात पालतेवर यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता, त्या अर्जावर काल जिल्हा व सत्र न्यायाधीश अली यांचे न्यायालयात सुनावणी झाली, २ तास चाललेल्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे जोरदार आक्षेप घेण्यात आला , आरोपीची पोलिस कोठडी घेणे आवश्यकच आहे, आरोपीने शासनाच्या योजने अन्वये शासनाची व गरीब जनतेची फसवणूक केली आहे, हे न्यायालयास पटवून दाखविले. आरोपी यास जामीन दिल्यास तो त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. आरोपीद्वारे देखील जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शेवटी न्यायालयाने आज बुधवारी आरोपीचा अटकपूर्व जमिनीचा अर्ज फेटाळून लावला. सरकार तर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली व आरोपी तर्फे वरिष्ठ अधिवक्ता अविनाश गुप्ता यांनी बाजु मांडली.
 
 


 
 
 
हे आहे प्रकरण
 
 
प्रारंभी मित्र, नंतर भागीदार त्यानंतर रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक आणि शासकीय यंत्रणेला भूल देणारे मेडिट्रिना हॉस्पिटलचे डॉ. समीर पालतेवार यांनी पोलिसांनाही भूल दिली आहे. सात दिवस होऊन आणि डॉ. पालतेवारांचा पत्ता, संपर्क माहीत असूनही पोलिस त्यांना अटक करण्याऐवजी हातावर हात धरून बसले. त्यामुळे डॉ. पालतेवारने पोलिसांना भूल दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
 
 
शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाला संबंधित डॉक्टर भूल देतात. त्यामुळे काय होत आहे, ते रुग्णाच्या लक्षात येत नाही. डॉ. पालतेवार यांनी रुग्णांचे नातेवाईक आणि शासकीय यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करून कोट्यवधी रुपयांचा अपहार केला. पालतेवारांच्या देखरेखीत चाललेल्या मेडिट्रिना हॉस्पिटलमधील फसवणुकीची ठोस पुराव्यानिशी तक्रार गणेश चक्करवार या त्यांच्या भागीदारांनी सहा महिन्यांपूर्वी केली. मात्र, ठोस पुरावे असूनही गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने गुन्हा दाखल करण्याचे टाळले. त्यामुळे चक्करवार यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांना २३ जानेवारीपर्यंत कारवाईचे निर्देश दिले. त्यामुळे पोलिसांनी २२ जानेवारीला डॉ. समीर पालतेवारविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
 
त्याला आता सात दिवस झाले. या सात दिवसात डॉ. पालतेवारांनी केलेल्या फसवणुकीची अनेक प्रकरणे आणि स्वतंत्र तक्रारीही पुढे आल्या. रुग्णांच्या नातेवाईकांसोबतच पालतेवारांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत अपहार केला. रुग्णांकडून बेकायदा रक्कम उकळली, बनावट नोंदी(व्हाऊचर)द्वारे हॉस्पिटलच्या खात्यातून पैसे काढले आणि बोगस दस्तावेज बनवून फसवणूक करण्याचाही सपाटा डॉ. पालतेवार यांनी लावल्याचेही उजेडात आले. पोलिसांनी डॉ. पालतेवारांच्या रुग्णालयातील कार्यालयात, निवासस्थानी, त्यांच्या काही साथीदारांकडे झाडाझडती घेतली. रुग्णालयातील लेखा विभागातून महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, हार्डडिस्क जप्त केली. मात्र, एवढे सर्व करूनही पोलिसांनी पालतेवारांना अटक करण्यासाठी कचखाऊ भूमिका वठविल्याने पालतेवारांनी पोलिसांनाही ‘भूल’ दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.