नॉर्वे बांधणार समुद्राखाली तरंगता बोगदा; ४० अब्ज डॉलर्स खर्चाचा अंदाज
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
 
 
 
 
 
 
 नॉर्वे :
 
नॉर्वे उंच पर्वतरांगा आणि समुद्रकिनारेसाठी प्रसिद्ध आहे. निसर्गाच्या या वैविध्येतेमुळे नॉर्वेमध्ये प्रवासाच्या अनेक अडचणी येत आहेत. प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी नॉर्वे समुद्राखाली तरंगता बोगदा बांधणार आहे. हा जगातील महत्वाकांक्षी प्रकल्प असून २०५० पर्यंत पूर्ण करण्याचा नॉर्वेचा मानस आहे. चीन, दक्षिण  कोरिया आणि इटली हे देशही अश्याच प्रकल्पावर काम करत आहेत. आता तंरगता बोगदा बांधण्याच्या शर्यतीत नॉर्वेही उतरला आहे.
प्रवासाच्या अडचणी कमी करण्यासाठी नॉर्वेचा हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. मात्र, असा बोगदा बांधण्यात अनेक अडचणी येत आहेत. आतापर्यंत असे प्रयत्न काही देशांकडून करण्यात आले आहे. मात्र, त्यात फारसे यश आलेले नाही. नॉर्वेयन पब्लिक रोड ऍडमिनिस्ट्रेशन  ( एपीआरए) या सरकारी संस्थेला याबाबतचे काम देण्यात आले असून २०५० पर्यंत हा बोगदा पूर्ण  करण्याचे उद्दीष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. या बोगद्यामुळे नॉर्वेची दोन टोके जोडली जाणार आहे. यामुळे व्यापार, वाहतूक, निर्यात आणि प्रवासाला फायदा होणार आहे. 
या प्रकल्पात सर्वात मोठे आव्हान समुद्राच्या लाटांचे आहे . या लाटांमध्ये तग धरणारे मजबूत बांधकाम करण्यासाठी समुद्रतळाशी खोलवर पाया घालण्याचे काम करावे लागणार आहे . तसेच या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे, जलचरांचे आणि तेथील जैवविविधतेचे नुकसान होणार नाही, याचाही काळजी घेण्याची गरज आहे. या प्रकल्पामुळे जलमार्गात अडचणी येऊ नये यासाठी समुद्राच्या पृष्ठभागाखाली १०० फूटांवर हा बोगदा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे लहान बोटी आणि जहाजे यांची वाहतूक सहज शक्य होणार आहे. तसेच या बोगद्याला पिलर नसल्याने जौवविविधेतेचेही नुकसान होणार नाही, असे एनपीआरएकडून सांगण्यात आले. या प्रकल्पासाठी सुमारे ४० अब्ज डॉलर्स एवढा खर्च होण्याचा अंदाज आहे.  या प्रकल्पाकडे नॉर्वेसह जगाचे लक्ष लागले आहे.