उपजत गुणांमुळेच प्रणवदांना ‘भारतरत्न!’
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
तळागाळातील जनतेच्या कल्याणासाठी आयुष्यभर जिवाचा होम करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व नानाजी देशमुख, महान गायक, संगीतकार स्व. भूपेन हजारिका यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या तिघा मान्यवरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार घोषित झाला आहे. नेहमीच्या सरकारी परंपरेनुसार यंदाच्या ‘भारतरत्न’ पुरस्कारांची घोषणा झाली आहे. महान समाजसेवक नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांच्या या पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल सर्वांनीच समाधान व्यक्त केले आहे. अमृतराव उपाख्य नानाजी देशमुख यांना ग्रामविकास, शिक्षण आणि आरोग्यक्षेत्रातील योगदानाबद्दल देशाचा हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या कार्यामुळे गावपातळीवरील जनजीवन बदलले आहे. ग्रामीण जनता सक्षम झाली आहे. नव्या पिढीला त्यांनी विकासाचा मार्ग दाखविला आहे. त्यांची मानवता, प्रेम आणि जनसेवा अद्वितीयच म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे भूपेन हजारिका यांच्या गीत आणि संगीताचे गारूड भारतीयांवर आजही कायम आहे. त्यांनी संगीत भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही लोकप्रिय केले. या दोन ‘भारतरत्नां’बद्दल लोकांच्या मनात कुठल्या शंका उपस्थित झाल्या नाहीत. तथापि, प्रणव मुखर्जी यांच्या नावाच्या घोषणेने अनेकांच्या पोटात दुखू लागले.
 
 
  
मोदी सरकारने मुखर्जी यांना पुरस्कार दिल्यामुळे विरोधी पक्षातील मंडळी विशेषतः कॉंग्रेसजन घायाळ झाले आहेत. आपल्या तोंडचा घास हिरावला गेल्याची त्यांची भावना झाली आहे. सत्तेत राहून विरोधकांना डावलले जात आहे, असे म्हणण्याची त्यांची प्राज्ञाच राहिलेली नाही. अनेकांनी तर प्रणव मुखर्जी यांना मिळालेल्या पुरस्काराचा संबंध, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निमंत्रण स्वीकारण्याच्या घटनेशी जोडला आहे. त्यातलेच एक महाभाग म्हणजे आझम खान. संघाच्या एका कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारले म्हणूनच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ मिळाले, असा जावईशोध त्यांनी लावला आहे. ‘भारतरत्न’ हा संघाने मुखर्जींना दिलेला आहेर आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. प्रणव मुखर्जींनी संघाचे निव्वळ निमंत्रणच स्वीकारले नाही, तर त्यांनी संघाच्या व्यासपीठावरून भाषणही केले होते असे नमूद करून, या निमित्ताने भाजपा पश्र्चिम बंगालमध्ये पाय पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा निष्कर्षही त्यांनी काढला आहे. प्रणव मुखर्जींना मिळालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराबद्दल इतका संकुचित अर्थ काढणारे आझम खान एकटेच नाहीत. त्यांना इतरही अनेकांची जोड आहे.
काही पत्रकारांनीही प्रणव मुखर्जी यांना मोदी सरकारने दिलेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराबद्दल आक्षेप नोंदविले आहेत. वायर नावाच्या वेबसाईटच्या पत्रकार आरखा खानून शेरवानी यांनी तर आगळाच मुद्दा उपस्थित केला आहे. त्या म्हणतात, मुखर्जी भारतरत्नसाठी पात्र ठरले याची कोणतीही तीन कारणे देता येतील का? असा प्रश्न उपस्थित करून, मला तर केवळ एकच कारण दिसते आणि ते म्हणजे मुखर्जींनी रा. स्व. संघाच्या मुख्यालयाला दिलेली भेट! अशी उपहासात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
एवढे मात्र खरे की, प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती असताना त्यांच्याकडे दयायाचनेसाठी आलेल्या 24 पैकी तीन जणांचे अर्ज खारीज केले होते. त्यामध्ये याकुब मेनन, अजमल कसाब आणि अफजल गुरू या अतिरेक्यांचा समावेश होता. या तिघांनी स्वतःच्या सुटकेसाठी न्यायालयांचा पुरेपूर वापर करून घेतला, पण प्रणव मुखर्जींनी तिघांचेही दयेचे अर्ज खारीज करून, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
 
वायरच्या पत्रकार आरखा खानून शेरवानी यांच्यापाठोपाठ कर्नाटकातील सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्यानेही, प्रणव मुखर्जी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिल्याने त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराचा खिताब देण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मुखर्जींनी केवळ संघ मुख्यालयालाच भेट दिली असे नाही, तर संघसंस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना त्यांनी भूमिपुत्र संबोधले, हेच त्यांच्या पुरस्कारामागचे खरे कारण असल्याचा त्यांचा दावा आहे. या सगळ्या प्रतिक्रिया अतिशय दुर्दैवी आहेत. बिजू पटनायक आणि कांशीराम यांना भारतरत्न का नाही, असा या नेत्याचा सवाल आहे. प्रणव मुखर्जी यांच्यापूर्वी या दोघांना हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार द्यायला हवा होता, असे त्यांनी नमूद केले आहे. देशातील अनेक उद्योगपती, मुखर्जी आणि मोदी यांचे समान मित्र आहेत, असाही त्यांना आक्षेप आहे.
 
जनता दल सेक्युलरच्या एका नेत्याने सिदागंगा मठाचे स्वामीजी श्री श्री शिवकुमारा स्वामी, ज्यांचे गेल्या वर्षी 111 व्या वर्षी निधन झाले, त्यांना भारतरत्न का नाही, असा सवाल केला आहे. स्वामीजी अजरामर आहेत आणि त्यांनी लक्षावधी लोकांच्या मनात प्रकाशाची पणती पेटविली असल्यामुळे तेच या पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती होते, अशी त्यांची सूचना आहे. पण, हे महोदय एवढे मात्र विसरले की त्यांचे नेते एच. डी. देवेगौडा पंतप्रधानपदी असताना स्वामीजींना भारतरत्न का देण्यात आले नाही?
 
अनेकांना तर प्रणव मुखर्जींना हा पुरस्कार, ते राष्ट्रपती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे जे मैत्र जुळले, त्यामुळे मिळाल्याचे वाटते. पण, कुठल्याही पुरस्काराकडे पक्षातीत पाहण्याची गरज आहे. भारतात लोकशाही आहे आणि तिची पाळेमुळे अगदी खोलवर रुजलेली आहेत. याच लोकशाहीत विरोधी पक्षात असतानादेखील माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्र संघात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याचप्रमाणे प्रणव मुखर्जी कॉंग्रेसचे प्रतिनिधी असल्याने त्यांना भारतरत्न देण्याचा अधिकार भारतीय जनता पार्टीच्या नेतृतत्वातील सरकारला नाही, असे होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीची वैचारिक उंची, त्याचे या देशाला असलेले योगदान, त्याच्यातील नेतृत्वगुण, त्याची सर्वसमावेशकता अशा अनेक गुणांचा विचार करून इतके मोठे पुरस्कार दिले जातात. त्यामुळे जसे नानाजी व भूपेन हजारिका यांना भारतरत्न दिले गेले, तद्वतच ते प्रणवदांनादेखील दिले गेले. उलट, कॉंग्रेसशी बांधिलकी असलेल्या व्यक्तीचीदेखील सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड करून, मोदी यांनी आपले सरकार किती उदार आहे, हे जगाला दाखवून दिले आहे. म्हणूनच मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जायला हवे.
 
प्रणव मुखर्जींवरील एका पुस्तकाच्या विमोचनप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले होते, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्यच समजतो. अनेकदा मला वेगवेगळ्या विचारसरणीच्या नेत्यांसोबत काम करताना खूप चांगले अनुभव आले आहेत. जेव्हा मी दिल्लीत आलो, तेव्हा प्रणवदांसारखे मार्गदर्शक मला लाभले, हे मी कधीही विसरणार नाही. प्रणवदांनी नेहमीच एखाद्या पित्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन केले, असे सांगत, ते कायम आपल्याला आराम करण्याचा, स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला द्यायचे, असेही याप्रसंगी मोदी म्हणाले होते. यातून मोदी आणि प्रणवदा यांच्यातील मैत्र निश्चितच प्रकट होते. पण, यातून कुणी प्रणवदांना मिळालेल्या पुरस्कारामागे हे मैत्र कारणीभूत असल्याचे सांगत असेल तर त्यांना मुखर्जी कळलेच नाहीत, इतकाच त्याचा अर्थ घ्यायला हवा.
 
प्रणवदा भारताचे चौदावे राष्ट्रपती होते. त्यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत, लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. प्रणव मुखर्जी यांचे सार्वजनिक जीवन व राजकीय प्रवास अतिशय खडतर राहिलेला आहे.
 
त्यांचा जन्म किरनाहर, जिल्हा बीरभूम (पश्चिम बंगाल) येथील. 13 जुलैला त्यांचा विवाह सुर्वा यांच्याशी झाला. दोन मुले आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार. कोलकाता विद्यापीठातील विद्यासागर महाविद्यालायत त्यांचे शिक्षण झाले. इतिहासाचे ते प्राध्यापक होते. राजकारणात येण्यापूर्वी ते पत्रकारदेखील होते. त्यांचे वडील स्वातंत्र्यसेनानी होते. 1920 सालापासून प्रणवदांनी कॉंग्रेसच्या सर्व आंदोलनांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. केंद्रात त्यांनी अनेक पदे भूषविली, विदेशदौरे केले, पुरस्कार मिळविले आणि अनेकदा कॉंग्रेस पक्षासाठी तारणहार म्हणूनही ते पुढे आले. अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी नेता, द्रष्टा राजकारणी, संयमित संसदपटू... अशी कितीतरी विशेषणे त्यांना लावता येतील. त्यांना मिळालेले भारतरत्न हे कुठल्याही संस्थेशी अथवा व्यक्तीशी संबंध आले म्हणून देण्यात आलेले नसून, त्यांनी व्यक्तिगत कार्यकर्तृत्वामुळे हा बहुमान खेचून आणला आहे, एवढाचा मथितार्थ आपण काढू शकतो...