राहत फतेह अली खानवर तस्करीचा आरोप; ईडीची नोटिस
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
मुंबई,
परकीय चलनाची देशाबाहेर तस्करी केल्याप्रकरणी पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान याला अंमलबजावणी संचालनालयाने फेमाअंतर्गत (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट) कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. राहत फतेह अली खान गेल्या काही वर्षांपासून परकीय चलनाची तस्करी करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्याच्याकडून योग्य खुलासा न केला गेल्यास त्याला अटक होण्याची शक्यता आहे.
 

 
 
 
राहतअली सुप्रसिद्ध दिवंगत पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांचे भाचे आहेत. 2009 मध्ये ‘लागी तुमसे मन की लगन’ या गाण्यासह त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने परकीय चलनाच्या माध्यमातून प्रचंड कमाई केली आहे. पण, त्याचा कोणताही हिशेब त्याने आयकर विभागाला दिलेला नाही. या चलनाची तो देशाबाहेर तस्करीही करत असल्याचेही आढळले आहे.
 
 
 
अंमलबजावणी संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, राहतने 3 लाख 4 हजार डॉलर्स कमवले होते, त्यातील 2 लाख 25 हजार डॉलर्स बेकायदेशीररीत्या भारताबाहेर पाठवले. इतके पैसे त्याने नेमके कसे कमावले आणि भारताबाहेर कुठे आणि का पाठवले, अशी विचारणा अंमलबजावणी संचालनालयाने त्याला केली आहे. राहतने या प्रश्नांची समाधानकारक उत्तर न दिल्यास त्याला तस्करी करण्यात आलेल्या रकमेच्या 300 टक्के दंड भरावा लागणार असून, दंड न भरल्यास त्याला अटक होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
 
 
2011 मध्ये परकीय चलन घेऊन जाताना त्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडवण्यात आले होते. त्यावेळी तो मांस निर्यातदार मोइन कुरेशी यांच्या दिल्लीतील घरी एका लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आला होता. याच मोईन कुरेशीकडून लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. राहतच्या मोईनसोबत असलेल्या संबंधांमुळे त्याच्यावरील संशय आणखी बळावला आहे.