लोकप्रिय मालिका ' हम पांच ' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :30-Jan-2019
 
 
 
 
 
 
९० च्या दशकात अनेक विनोदी मालिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसविले असून  त्यातलीच एक मालिका म्हणजे ‘हम पांच’. माथुर दाम्पत्य आणि त्यांच्या पाच मुली यांच्यावर ही मालिका आधारित होती. १९९५ ते २००६ या कालावधीमध्ये ‘हम पाच’ या मालिकेने प्रेक्षकांच चांगलंच मनोरंजन केलं होतं. मात्र काही काळानंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता ही मालिका पुन्हा सुरु होणार आहे. 
 
‘हम पांच फिर से’, असं या मालिकेचं नवं नाव असून ऐस्सेल व्हिजन प्रायव्हेट लिमिटेडअंतर्गत ही मालिका प्रसारित होणार आहे. नव्याने सुरु होणाऱ्या या मालिकेमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. सध्या या मालिकेमध्ये अभिनेत्री जयश्री व्येंकटरमणा ही काजोल भायची भूमिका वठविणार आहे. जयश्रीने स्वत: या विषयी खुलासा केला आहे. तर अंबिका सप्रे राधिकाची भूमिका साकारणार आहे. या अभिनेत्रींव्यतिरिक्त अन्य कलाकारांचा शोध सुरु आहे. त्यामुळे येत्या मे महिन्यामध्ये ही मालिका  सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
 या मालिकेमध्ये अशोक सराफ, प्रिया तेंडुलकर, राखी टंडन, भैरवी रैचुरा,वंदना पाठक आणि विद्या बालन यांसारखे कलाकार झळकले होते. या साऱ्यांनी आपल्या उत्तम अभिनयामुळे मालिकेची रंगत वाढविली होती.त्यामुळे आता पुन्हा नव्याने सुरु होणाऱ्या या मालिकेत नवे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.